भुसावळ (प्रतिनिधी )- शहरापासून दूर अंतरावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोवीड केअर सेंटरमध्ये अनेक असुविधा असल्याने येथे कॉरंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी मदतकार्य पोचविण्यासाठी देखीलअनेक अडथळे येत असल्याने ही जागा तत्काळ बदलून महामार्गावरील तिरुपती लॉन येथे सुविधा द्यावी, अशी मागणी नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
भुसावळ शहरात आतापर्यंत ११ कोरोनाबाधीत लोक सापडले असून शहराचा काही भाग हा कंटेनमेन्ट झोन म्हणून घोषित झाला आहे. प्रशासनाने बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह हे कॉरंटाइन सेंटर म्हणून घोषित केलेले असून शहरातील बरेच नागरीक बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना कॉरंटाईन करण्यात आले आहे मात्र कॉरंटाईन सेंटर येथे ठेवण्यात आलेल्या लोकांचे खूप हाल होत आहेत. या सेंटर ला कोणतीही सध्या खाण्या-पिण्याची व्यवस्था नाही तसेच कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसून मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत. यामुळे येथे कॉरंटाईन करण्यात आलेले रुग्ण अनेक कठीण परीस्थितीत वेळ काढून नेत आहेत. सध्या येथे माजी नगरसेवक प्रकाश बत्रा आणि नगरसेवक निर्मल कोठारी हे काम करीत आहे. शासनाकडून कोणीही लक्ष देण्यास तयार नाही, अशी व्यवस्था असेल तर लोक कसे सुरक्षित राहतील व कॉरंटाईन करण्याचा कोणताही उपयोग होणार नाही, असेही नगरसेविका बत्रा यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रीय महामार्गालगत तिरुपती लॉन असून तेथे जर कॉरंटाइन सेंटर करण्यात आले तर किमान १५० लोकांची राहण्याची व उपचाराची व्यवस्था होऊ शकेल. लाँनचे मालक देखील सामाजिक भावनेतून वास्तू उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथील असुविधांचा विचार होऊन नवीन तिरुपती लॉन येथे बदलविण्याचा विचार व्हावा व नागरीकांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणीही नगरसेविका पुष्पाबाई बत्रा यांनी केली आहे.



