रामानंद पोलिसांची कामगिरी : आठ वर्षांनंतर चोरीचा उलगडा ; बंगाली आरोपीला वाराणसीमधून अटक ; तब्बल ११ लाख ९० हजारांचे सोने हस्तगत

जळगाव प्रतिनिधी : रामानंद नगर पोलिसांनी तब्बल आठ वर्षांपूर्वी झालेल्या सोन्याच्या अपहार प्रकरणाची उकल करत संशयित आरोपीला वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून तब्बल ₹११ लाख ९० हजार रुपये किमतीची १०० ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली असून, पोलिसांनी उत्कृष्ट तपास कौशल्याचे प्रदर्शन केले आहे.

दि. ३० मार्च २०१७ रोजी फिर्यादी सचिन वसंतराव भामरे (रा. आर.एल. कॉलनी, गांधी नगर, जळगाव) यांचे पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केटमधील साई ज्वेलर्स या दुकानात काम करणारा सुशांत सुनिल कुंडु (वय ३९, रा. नस्कर पारा, संत्रागाछी, जि. हावडा, पश्चिम बंगाल) या कामगाराने दागिने बनविण्यासाठी दिलेले तब्बल ३० तोळे सोनं अपहार करून मूळ गावी पसार झाला होता. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२/२०१७ भा.दं.वि. कलम ४०८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा पश्चिम बंगाल आणि परिसरात वेळोवेळी शोध घेतला; परंतु तो अदृश्य असल्याने हा गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात आला होता.

अलीकडेच सपोनि भूषण कोते यांना आरोपी वाराणसी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले. त्या पथकाने संशयित सुशांत सुनिल कुंडु यास वाराणसी, उत्तर प्रदेश येथून अटक करून जळगाव येथे आणले. दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यास औपचारिक अटक दाखल करण्यात आली.

सपोनि भूषण कोते यांनी तपास पुढे चालू ठेवत आरोपीकडून कलकत्ता, पश्चिम बंगाल येथून अपहार केलेले ₹११ लाख ९० हजार किंमतीचे १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण कोते, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक योगेश बारी, अतुल चौधरी, पोशि अनिल सोननी आणि दिपक वंजारी यांनी विशेष मेहनत घेतली.