लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला जमावाकडून चोप ; दुचाकीही जाळली ! ८ ते १० जण ताब्यात ;

जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव शहरातील मोहाडी रोडवर शनिवारी, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लव जिहादच्या संशयावरून एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण करून त्याची दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी ८ ते १० जणांना ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एक तरुण आणि तरुणी शनिवारी दुपारी जळगावातील मोहाडी रोड परिसरातील एका दुकानाजवळ थांबले होते. यावेळी काही स्थानिक तरुणांनी त्यांच्याशी विचारपूस केली. या दरम्यान, दुचाकीवरील तरुणाने अर्वाच्य भाषेचा वापर केल्याने वाद वाढला. लव जिहादचा संशय आल्याने संतप्त जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याची दुचाकी पेटवून दिली, ज्यामुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली.

जखमी तरुणाला तातडीने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी ८ ते १० संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.