भुसावळकरांनी विविध रानभाज्यांचे महत्व जाणुन केली खरेदी ; रोटरी रेल सिट व कृषी विभाग आयोजित रानभाजी महोत्सव उत्साहात;

भुसावळ, (ता. १७ प्रतिनिधी )- येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व तालुका कृषी विभागातर्फे आज रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात भाज्यांचे महत्व जाणुन घेत भुसावळकरांनी खरेदी केली. इनरव्हिल रेल सिटी व भुसावळ नगरपालिका यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.
म्युनिसिपल हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. यावेळी
वरणगाव येथील मंडळ कृषी अधिकारी ऋषीकेश चौधरी, आत्मा कृषी विभागाचे तालुका तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव, रोटरी रेल सिटीचे सचिव हरमीतसिंग माखन, प्रोजेक्ट चेअरमन योगेश अग्रवाल, को-चेअरमन मनिष पाचपांडे, माजी अध्यक्ष विशाल शाह, इनरव्हिल क्लबच्या सचिव योगीता वायकोळे, माजी नगरसेविका मेघा वाणी आदी उपस्थित होते. याप्रसंगी तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी रानभाज्यामध्ये असलेले विविध प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे यांविषयी माहिती सांगून त्याचे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक, आरोग्यदायी व पौष्टिक गुणधर्म याविषयी मार्गदर्शन. करून ह्या रानभाज्या नियमीत सेवनाने बरेच असाध्य आजार बरे होतात रानभाज्या गुणकारी आहेत असे सांगितले.
महोत्सवात जळगाव, भुसावळ, यावल, जामनेर व मुक्ताईनगर येथील शेतकरी गटांनी रानभाज्याचे व पाककला कृतीसह खाद्य पदार्थाचे स्टाॅल लावले होते.
उत्कृष्ट पाककला कृतीसाठी श्री गणेश महिला शेतकरी गट विल्हाळे यांना रानभाज्यापासून तयार केलेले फाग पानांचे फुणके, अंबाडी पानांची कढी, शेवगा पानांचे धपाटे व मुगाच्या हेडन्या यासाठी देण्यात आले, द्वितीय पारितोषिक व्यंकटेश मशरुम फार्म चे श्री केतन चौधरी यांचे मशरुम वडापाव व सुप यासाठी तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शशिकला भंगाळे भुसावळ यांना अळू पानाचे व कोथिंबीर वड्या यासाठी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महोत्सवाथ एकूण ३६ शेतकरी व महिला गटांनी रानभाज्याचे स्टाॅल व पाच पाककला कृतीसह खाद्य पदार्थाचे स्टाॅलसाठी सहभाग नोंदवला.
इनरव्हील क्लब भुसावळ यांचे तर्फे टाकाऊ कपड्यांपासून टिकाऊ इको फ्रेंडली पिशव्या तयार करून त्यांचे रानभाज्या खरेदीदार नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले.
महोत्सव यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी शरद बोरसे, रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष देवेंद्र वाणी, इनरव्हिलच्या अध्यक्षा सीमा सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तालुका कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचार, रोटरी रेलसिटीचे व इनरव्हील रेल सिटीचे सदस्य यांनी परीश्रम घेतले.

फोटो ओळ –

भुसावळ : रोटरी रेल सिटी व कृषी विभागातर्फे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करतांना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे. सोबत क्लबचे सचिव हरमीतसिंग माखन, प्रोजेक्ट चेअरमन योगेश अग्रवाल, मनिष पाचपांडे, कृषी विभागाचे प्रमोद जाधव आदी.

2 ) माजी नगरसेविका मेघा वाणी व महिला भगिनी रानभाज्या बाबत माहिती घेऊन खरेदी करतांना …

3 )पाककला कृती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेला श्री गणेश महिला शेतकरी गट विल्हाळे यांना गिफ्ट व प्रमाणपत्र देऊन गौरवितांना कृषि विभाग व रोटरी क्लब चे पदाधिकारी