रस्त्यावर पाणी सोडल्याने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात; नागरिकांमध्ये तीव्र संताप

भुसावळ (प्रतिनिधी)- महेश नगर परिसरातील सर्वे नंबर १९५/३ मधील रमण नेमाडे व सुनील नेमाडे तसेच स्थानिक डॉ. हर्षल अविनाश पाटील यांच्या दवाखान्याच्या पश्चिम व दक्षिण बाजूला असणाऱ्या मुख्य रस्त्यावर उघड्यावर व भर रस्त्यात पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. तसेच हरी प्लाझाच्या समोर आणि 'शगून'च्या पूर्व भागातील आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील सांडपाणी एकाच ठिकाणी साचून राहिल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्त्यावर दीर्घकाळ साचून राहिलेल्या या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली असून परिसरात डेंग्यू, हिवताप (मलेरिया) आणि इतर साथीचे आजार पसरण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. रोजच्या रहदारीच्या रस्त्यावरच पाण्याचे डबके साचल्यामुळे स्थानिक रहिवासी, रुग्ण आणि वाटचाऱ्यांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार सांगूनही यावर योग्य ती उपाययोजना न केल्याने परिसरातील नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पर्यावरणाचा समतोल बिघडवून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणे, रस्त्यावर सांडपाणी सोडून अस्वच्छता पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे. स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबवण्यासाठी आणि संभाव्य साथीच्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी संबंधित दोषींवर तात्काळ कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आता या गंभीर समस्येकडे पालिका/स्थानिक प्रशासन काय पावले उचलते आणि दोषींवर नेमकी काय कारवाई करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.