प्रलोभनांना बळी पडू नका, माय-बापासह गुरुचा चेहरा नजरेसमोर ठेवा; द्वारकाई व्याख्यानमाला : पुण्याच्या प्रा. अश्विनी टाव्हरेंचा तरुणाईला मोलाचा सल्ला, भुसावळात गुंफले प्रथम पुष्प

भुसावळ (प्रतिनिधी ) – : सध्याचा काळ अस्वस्थ करणारा आहे. कारण तरुण-तरुणी यांना बिघडवणारी साधने अगदी सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. मात्र घडवणाऱ्या साधनांपर्यंत स्वतःहून पोहोचावं लागते हे दुर्दैव म्हणावे लागेल. वयात येणाऱ्या मुलींनी या परिस्थितीत प्रत्येक पाऊल सजगपणे पुढे टाकावे, असा सल्ला पुण्याच्या प्रा. अश्विनी टाव्हरे यांनी दिला.

भुसावळात जय गणेश फाउंडेशनने स्वर्गीय द्वारकाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती द्वारकाई व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यात मंगळवारी प्रथम पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. अहिल्यादेवी कन्या विद्यालयात ‘कळी उमलताना आवश्यक संस्कार’ या विषयावर त्यांनी हे विचार पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मांडे हे होते. विचारमंचावर मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे उपस्थित होते. भुसावळची सांस्कृतिक चळवळ प्रवाहीत ठेवण्यासाठी ही व्याख्यानमाला महत्त्वाची ठरते आहे. सलग अकरा वर्षे ती सुरू असल्याने विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी आहे. सुसंस्कृत समाज, पिढी घडवण्यासाठी असे उपक्रम दिशा देणारे ठरतात असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र मांडे यांनी व्यक्त केले.

प्रलोभनांना बळी पडू नका…

आपल्या हाडांची काडं आणि रक्ताचं पाणी करून आई-वडील मुलांना मोठं करतात. आपलं आयुष्य घडवण्यासाठी गुरू अविरत परिश्रम घेतात. त्यांचा चेहरा नजरेसमोर आला तर कोणत्याच प्रलोभनांना आपण कधी बळी पडणार नाही. अर्थात, आपली संस्कृती, समाज या गोष्टी आपल्याकडून जपल्या जातील, असे टाव्हरे म्हणाल्या.

सोशल मीडियात अडकू नका…

विज्ञान, तंत्रज्ञानाचे हे युग आहे. काळ विमानाच्या वेगाने बदलतो आहे. आदर्श तरुण-तरुणी, आदर्श जबाबदार नागरिक घडण्यासाठी केवळ सोशल मीडियात अडकून चालणार नाही तर मेंदुतील कुविचारांची घाण साफ करणारी पुस्तके वाचावी लागतील. मुलींनी अनोळखी व्यक्तीशी जवळीक करू नये. तारुण्यभान सांभाळायला हवे. कुटुंबात आई-वडील, शाळेत शिक्षक-शिक्षिकांकडे मन मोकळं करा असा मायेचा सल्ला वक्ते प्रा. टाव्हरे यांनी लेकींना दिला.

कवितांतून जागवले समाजभान..

कविता म्हणजे थेट काळजाला भिडणारा साहित्य प्रकार आहे. हे लक्षात घेऊन व्याख्यानात टाव्हरे यांनी कवी अनंतकुमार ढोले यांची ‘होणार साध्य नाही मस्तीत नाचल्याने, होते गढूळ पाणी खड्डयात साचल्याने’ आणि हौसराव उबाळे यांची ‘मदतीसाठी ओरडू नका, मदतीला कोणी येणार नाही, या देशात शंभर टक्के आरक्षण मिळेल पण संरक्षण मात्र मिळणार नाही’ ही कविता सादर केली. त्यांच विश्लेषण करताना अन्वयार्थ समजावून सांगितला.