भुसावळ (प्रतिनिधी ) : राज्यातील सात कोटी लाभार्थींना अन्नधान्य पुरवणार्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे हे कमिशन आता 150 रुपयांवरून 170 रुपये होणार आहे. या निर्णयाचा लाभ शहरासह ग्रामीण भागातील 129 रेशन दुकानदारांना होणार आहे.

या बैठकीत अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाफेडमार्फत केंद्र सरकारच्या मान्यतेने मिळणार्या 10 जीवनावश्यक वस्तूंची विक्री शिधावाटप दुकानांतून करण्यासही परवानगी देण्यात आली. शिधावाटप दुकानदारांच्या दीर्घकालीन मागण्या या निर्णयांमुळे पूर्ण होत आहे. राज्यातील शिधावाटप यंत्रणा अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. स्मार्ट रेशनकार्ड, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, जीपीएस ट्रॅकिंग आणि लाईव्ह मॉनिटरींग यंत्रणा राबवण्यात येणार आहेत. गुजरातमधील यंत्रणेचा अभ्यास करून महाराष्ट्रात ही सुधारित प्रणाली लागू केली जाणार आहे. शहरातील 66 तर ग्रामीण भागातील 63 रेशन दुकानदारांनी सुध्दा दिवाळीच्या काळात संपाची हाक दिली होती. त्यांच्याही मागण्या आता मान्य होत आहे. अजित पवार यांनी प्रलंबित प्रकरणांची तातडीने सुनावणी करण्याचे निर्देश दिले असून, धान्यवाटपात हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले.


