: धरणगाव प्रतिनिधी
जीवन जगताना कुठली तरी एक कला जोपासली पाहिजे. निरंतर साहित्य वाचनाने माणूस समृद्ध होत असतो. साहित्यातील सहज मनाला भिडणारा व अचूक वेध घेणारा लेखन प्रकार म्हणजे कविता हा आहे. शेती-मातीच्या कविता कष्टकरी शेतकऱ्याचं जीवनगाणे मांडतात. कविता प्रश्नांचे उत्तर शोधून आदर्श जीवन जगण्याचा मार्ग सांगते. असे स्पष्ट मत हिंगोली येथील कवी गणेश आघाव यांनी येथे मांडले.

धरणगावच्या इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श प्राथमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आदर्श विद्यालयाचे चेअरमन सी.के. पाटील यांच्या सहकार्याने बुधवारी ‘कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला’ हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात कवी आघाव यांनी ‘चला फुलवू या कवितेचा मळा’ हा विषय गुंफला. सामाजिक, शैक्षणिक, कृषी जीवन मांडणाऱ्या कवितांची गुंफण त्यांनी केली. इंदिरा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. एस. पाटील, प्राथमिकचे मुख्याध्यापक बळवंत पाटील, आदर्शचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, इंदिरा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. एस. पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचा उद्देश किरण चव्हाण यांनी मांडला. समारोपात त्यांनी सादर केलेली ‘बाप’ कविता विद्यार्थ्यांना मनापासून भावली.
कवितेतून शेतीशिवाराचा जागर…
कवी आघाव यांनी सर्वप्रथम ‘भुईच्या दाराला मिरूग सांडतो, बैला संगती मोघडा हाकतो’, ‘भुईच्या भेगात पाऊस मुरला, सरला सरला दुष्काळ सरला’ अशा नानाविध कवितांतून कृषी जीवनाची वैशिष्ट्ये मांडली. भाषेचा गोडवा कवितेला गाण्याचं रूप देतो. ही कविता जेव्हा वाड्यावस्त्यांवर पोरं सुरात गुणगुणतात तेव्हा लिखाण सार्थकी लागते. संस्कारशील पिढी घडवण्यासाठी हातात मोबाइल नव्हे पुस्तक असायला हवे. भाषा गोड व मधूर असायला हवी. कलेचा ध्यास घेतला पाहिजे असे ते म्हणाले.
कविता गायनाला विद्यार्थ्यांची दाद
काचकागऱ्यांचा खेळ, झाडं बोलतात, बाप मातीचा विठ्ठल या कविताही सादर केल्या. त्यांना विद्यार्थ्यांनीही साथसंगत केली. तब्बल सोळा भाषांमध्ये अनुवाद झालेली ‘पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पऱ्यांना पुसती तुम्ही गं कुणाच्या?’ ही कविता सादर करताना आघाव यांनी त्यांचा कवितेचा प्रवास आणि प्रेरणा मांडली. आदर्श विद्यालयाचे चेअरमन सी.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक एन.बी. पाटील, डी.एन. पाटील, जी.पी. चौधरी, पी.बी. साळुंखे व शिक्षकांनी परीश्रम घेतले.
मुलांना लागला कवितेचा लळा
कवितेच्या कार्यक्रमाला दीड तास विद्यार्थी खिळून होते. अर्थात, त्यांची सांस्कृतिक भूक खूप मोठी आहे हे लक्षात आले. साहित्याचा त्यांना लळा लागावा म्हणून पुढच्या शैक्षणिक सत्रात असे उपक्रम व्यापक स्वरूपात राबवू. कवी आघाव यांची शब्दांवरील पकड, गोड गळा, कवितेचे विषय आणि आशय हृदयाला भिडणारा आहे अशी भावना सी. के. पाटील यांनी व्यक्त केली.
फोटो ओळ – धरणगावच्या इंदिरा गांधी विद्यालयात कविता सादर करताना कवी गणेश आघाव व विद्यार्थी.


