अमळनेर

तालुक्यातील सात्री गावात बुधवारी (२ एप्रिल) रात्री सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. एकापाठोपाठ झालेले स्फोट आणि वेगाने पसरलेली आग यामुळे गावात घबराट पसरली. या दुर्घटनेत आठ घरे जळून खाक झाली असून, वाऱ्यामुळे आगीचा फैलाव वाढल्याने बचाव कार्य अधिक कठीण बनले.
रात्री आठच्या सुमारास सात्री गावातील एका खळ्याला अचानक आग लागली. या ठिकाणी साठवून ठेवलेले चार ते पाच गॅस सिलेंडर आगीच्या विळख्यात आले. सिलेंडरचा भीषण स्फोट होताच आजूबाजूच्या घरांना आग लागली. या धक्कादायक घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्फोटानंतर अमळनेर येथून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र, सात्री गाव तापी नदीच्या काठावर असल्याने तेथे पोहोचताना अडथळे आले. अग्निशमन वाहन नदीतील वाळूत अडकल्याने त्यास जेसीबीच्या मदतीने बाहेर काढावे लागले. शेवटी, अमळनेर, धरणगाव, चोपडा आणि पारोळा येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या. आग विझवण्याचे काम अखेर उशिरा रात्रीपर्यंत सुरू होते. स्थानिक प्रशासनाने तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली असून, जळालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने संपूर्ण सात्री गाव हादरले असून, प्रशासनाकडून मदत कार्य वेगाने सुरू आहे.


