जळगाव प्रतिनिधी ;– पुण्याहून जळगावला परतणाऱ्या महिलेच्या बॅगेतून तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. हा प्रकार महिनाभरानंतर लक्षात आल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकनगर येथे राहणाऱ्या आशा विकास कुलकर्णी (वय ५०) या मुलाच्या लग्नासाठी पुण्याला गेल्या होत्या. ७ फेब्रुवारी रोजी लग्न पार पडल्यावर त्यांनी २ लाखांचे मंगळसूत्र, २ लाखांच्या पाटल्या आणि ३२,५०० रुपयांचे कर्णफुले असे एकूण ४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे दागिने एका बॅगेत ठेवले. हे दागिने त्यांनी मुलाच्या घरी सुरक्षित ठेवले होते.
कुलकर्णी दाम्पत्य २३ फेब्रुवारीला खासगी ट्रॅव्हल्सने जळगावला परतले. प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्स दोन ठिकाणी थांबली होती. त्यानंतर जळगावातील आकाशवाणी चौकात उतरल्यानंतर ते घरी गेले.
महिनाभरानंतर लक्षात आला प्रकार
घरात साफसफाई करत असताना २४ मार्च रोजी त्यांनी बॅग उघडली असता दागिने गायब असल्याचे आढळले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सलीम तडवी करीत आहेत. ट्रॅव्हल्समध्ये चोरी झाली की इतरत्र, याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत.



