जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित आठव्या आवृत्तीचा खानदेश रन उत्साहात संपन्न

जळगाव – जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित “खानदेश रन” या प्रतिष्ठित स्पर्धेची आठवी आवृत्ती आज रविवार 5 रोजी सागर पार्क येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय केंद्रीय क्रीडा आणि युवा कार्यक्रम राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते झाले.

खानदेश रनमध्ये विविध वयोगटातील लोकांसाठी 21 किलोमीटर,
5 किलोमीटर, 10 किलोमीटर तसेच 3 किलोमीटर असे विविध प्रकारचे रेस प्रकार ठेवण्यात आले होते. जळगाव आणि आसपासच्या परिसरातील फिटनेसप्रेमी आणि धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेत फिटनेस आणि एकोप्याचा संदेश दिला.

केंद्रीय क्रीडा आणि युवा कार्यक्रम राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी आरोग्य व फिटनेससाठी धावण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि खानदेश रनसारख्या उपक्रमांनी समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी
जळगाव रनर ग्रुपने आरोग्य आणि फिटनेसप्रती जागृती निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार खरोखर प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आठव्या आवृत्तीने स्थानिक पातळीवरच नव्हे, तर खानदेशभर उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. खानदेश रन 2025 चे यशस्वी आयोजन जळगाव रनर ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे उत्तम उदाहरण आहे. भविष्यातही असे उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध गटांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण यासोबतच सहभागी सर्व धावपटूंना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व आमदार .सुरेश (राजुमामा) भोळे यांच्यासह नाशिक विभागीय पोलीस महानिरिक्षक .दत्तात्रय कराळे, जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत, .केदार बारबोले, जैन ईरिगेशनचे संचालक अथांग जैन, सुप्रिम पाईपचे .सुरेश मंत्री, ऊद्योजक मनोज अडवाणी, .राजेश चोरडिया, जळगाव ग्रुपचे किशोर नाहटा , प्रतिक मणियार, किरण बच्छाव यांची उपस्थिती होती.