मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक –


राज्यात गाजत असलेल्या बीडमधील सरपंच हत्याप्रकरणात गुन्हे शाखेने तीन आरोपींना शुक्रवारी अटक केली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व सिद्धार्थ सोनवणे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, शनिवारी केज न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.
आरोपींना पुण्यात बेड्या
संतोष देशमुख हत्या प्रकरणात यापूर्वी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार अटकेत असून आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे पसार असल्याने त्यांचा कसून शोध सुरू होता. आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली तर आरोपींना सरपंचाबाबत माहिती देणारा सिद्धार्थ सोनवणे यास शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. खून प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्याप पसार आहे.
गुन्हे शाखेची मोठी कारवाई
बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल परिसरातील एका खोलीतून घुले आणि सांगळे यांना ताब्यात घेण्यात आले तर कृष्णा आंधळे तेथून पसार झाल्याची माहिती आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. मात्र, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि संतोष आंधळे हे तीन आरोपी पसार होते. त्यांना पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी डॉ. संभाजी वायबसे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना पोलिसांनी शुक्रवार, 3 रोजी अटक केली.
संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींचे एन्काऊंटर करा : खोत
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील गुन्हेगारांना न्यायालयातून फाशीची शिक्षा होईपर्यंत वाट पाहण्यात थांबण्यापेक्षा अशा या फाळकुट दादांना भर चौकात गोळ्या घालून त्यांचे एन्काऊंटर करायला हवे म्हणजे राज्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हेगारी डोके वर काढणार नाही, अशी मागणी शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केज तालुक्यातील मस्साजोग येथे केली.