भुसावळ – प्रत्येक व्यक्ती नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला येणाऱ्या वर्षासाठी काहीतरी नियोजन करीत असतो. त्यात प्रामुख्याने अभ्यास, व्यायाम आदी उपक्रमांचा समावेश असतो. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सदस्य प्रत्येक मंगळवार, गुरुवार व रविवारी रनिंगचा सराव करत असतात व देश-विदेशातील वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये शहराचे व असोसिएशनचे नाव उंचावत असतात. इतर नागरिकांना यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या हेतूने बुधवारी १ जानेवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी शहरातील रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या कृष्णचंद्र सभागृहाशेजारी पहाटे ६.०० वाजता असोसिएशनचे धावपटू व योगसाधक मैदानावर जमले व प्रा. प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनात सुरुवातीला वॉर्म अप एक्सरसाइजला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील आरपीडी रस्त्यावर धावायला सुरुवात झाली व धावणे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मैदानावर परतून सर्वांनी योगाभ्यास केला.
यावेळी नवीन वर्षाची पहाट आरोग्यदायी झाल्यामुळे व आपले सर्व मित्र मैत्रीण एकत्र धावल्यामुळे सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उसंडून वाहत होता. सदरच्या उपक्रमामुळे रेल्वे स्टेशन जवळून जाणारे प्रवासी व इतर नागरिक या धावपटूंना टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते व इतकी आरोग्यदायी नवीन वर्षाची सुरुवात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत होते.

‘लेडीज इक्वलिटी रनच्या नाव नोंदणीस सुरुवात’
त्यानंतर ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेडीज इक्वलिटी रनची नाव नोंदणी प्रक्रिया १ जानेवारी च्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी ५० हून अधिक महिलांनी यामध्ये नावनोंदणी केली त्यामुळे आयोजकांचा उत्साह अधिकच दुणावला.यावेळी असोसिएशनच्या डॉ चारुलता पाटील, डॉ तुषार पाटील, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील आदी सदश्यांसोबतच धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, कीर्ती मोताळकर, मुकेश चौधरी, मनीषा सिंग यांचे सहकार्य लाभले.


