ऑनलाई मोबाईल पार्सल मध्ये मोबाईल ऐवजी निघाला साबण ; तांदलवाडीतील अजब प्रकार

खिर्डी,

आजकाल लोक अनेक वस्तू ऑनलाईन मागतात. मात्र यावेळी फसवणूक देखील होते. मागवलेल्या वस्तूऐवजी बऱ्याचदा काहीही वस्तू डिलिव्हरी केल्या जातात. अशीच एक घटना तांदलवाडीतील खिर्डी येथे घडली. एका व्यक्तीने ऑनलाईन मोबाईल मागवला मात्र त्या बॉक्समध्ये चक्क साबण निघाले.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी सुनील दशरथ पाटील यांनी त्यांच्या मित्रामार्फत एक ऑनलाइन अँपवरून प्रख्यात कंपनीचा 12500 रु किमतीचा मोबाईल ऑफर असल्याने दि.२० डिसेंबर रोजी बुक केला होता. दि.२२ डिसेंबर रोजी त्यांना त्याची डिलिव्हरी मिळाली. डिलिव्हरी देते वेळेस पाटील स्वतः घरी नसल्याने त्यांच्या मुलीने तो मोबाइल घेऊन पैसे दिले व वडिलांना फोन लावत ओटीपी मागीतला तो दिल्यानंतर डिलिव्हरी बॉय निघून गेला. नंतर मोबाईल बॉक्स उघडताच त्यांना धक्काच बसला.

मोबाईल बॉक्स वरून सर्वसामान्य दिसत होता पण आतमध्ये डेटॉल कंपनीचे तीन व संतूर कंपनीचे दोन असे पाच आंघोळीचे साबण निघाले. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी कस्टमर केअरला बऱ्याच वेळा फोन केला पण ते समाधान कारक उत्तर देत नाहीय. डिलिव्हरी बॉयला फोन लावला तर तो म्हणतो मी नवीन आहे माझ्या बाबतीत ही पहिलीच घटना असल्याने तोही हतबल दिसून आला. तेव्हा आता काय करायचे कळत नाहीय.

एक सर्वसाधारण घरातील व्यक्तीसाठी ही रक्कम बरीच मोठी असते. एवढ्या किमतीचा मोबाईल फोन घेण्यासाठी कोणालाही बरीच काटकसर व बचत करावी लागते. पण ज्यावेळी अशी घटना घडते तेव्हा त्या व्यक्तीची काय परिस्थिती असते ते त्यालाच ठाऊक असते. बऱ्याच वेळेस कंपनीचा दोष नसतो तर डिलिव्हरी देणारे हे कारस्थान करीत असतात. तेव्हा नागरिकांनी सतर्क राहूनच ऑनलाइन खरेदी करावी अशी सर्वत्र चर्चा होत आहे.