बोदवड – संपुर्ण जगभरात दहशत निर्माण करणार्या कोरोना व्हायरस संशयीत बोदवडात असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दोन दिवसापूर्वी तालुक्यातील मानमोडी येथील कोरोना संशयित तरुणास जिल्हा रूग्णालयातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले होते.हा (२३) वर्षीय तरुण पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे.हि कंपनी बंद झाल्याने तो गेल्या दोन – तीन दिवसांपुर्वी आपल्या मानमोडी गावी आला होता.काही लक्षणे जाणवल्यामुळे व बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीबाबत माहिती देण्याचे शासनाचे आवाहन असल्याने गावातील पोलीस पाटील यांनी ही बाब बोदवड तहसिलदार रविंद्र जोगी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून जिल्हा रुग्णालयाच्या टिमने मानमोडी येथे येत पुढिल उपचारासाठी त्या तरुणास योग्य त्या तपासणीसाठी व योग्य त्या खबरदारीसाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.व त्या तरुणाच्या वैद्यकीय तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून होतो.
या तरुणाची जळगाव येथे वैद्यकीय तपासणी करून ते नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते व तरुणास दि.१९ रोजी घरी पाठविण्यात आले होते.आज दि.२० रोजी आलेल्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर हा संशयित तरुण ‘निगेटिव्ह’ असल्याचा खुलासा झाला असून त्यास कोरोनाची लागण झाली नसल्याचे सिध्द झाले आहे.मात्र पुढिल १४ दिवस त्यास इतरत्र कुठेही न जाण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज चौधरी यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही याची तालुक्यातील नागरिकांनी आपली काळजी व योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.



