भुसावळ – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हा संघटक प्रा. डॉ दयाघन एस राणे यांचा नुकताच मुंबई येथे एका विशेष समारंभात सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स परिसरात असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे मुखपत्र असणारे मासिक “कल्याण यात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा” या मासिकाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती विषयाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत समाजात व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, या सोबतच ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, ड्रग आणि नारकोटीक्स विभागाचे अतिरिक्त आयुक्त . समीर वानखेडे, अजयकुमार सर्वगौड, जिल्हा अभियंता, सिंधुदुर्ग, अविनाश पाटील, कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, महाराष्ट्र., अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते, श्रीमती वर्षा विद्या विलास सरचिटणीस, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कल्याण यात्रा मासिकाच्या विशेष थीम चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करून सादर सन्मान सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कल्याण यात्रा हे मासिक गेल्या ६६ वर्षापासून व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन करण्याच्या हेतूने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दर महिन्याला प्रकाशित होत असते. या मासिकासाठी अभ्यासपूर्ण लेख आणि इतर ही साहित्य लिहिणाऱ्या लेखकांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करीत असताना ड्रग आणि नारकोटिक्स विभागाचे अतिरिक्त आयुक्त श्री समीर वानखेडे यांनी सांगितले की मादक पदार्थ हे काही हजार रुपयांच्या कच्च्या मालापासून तयार केली जातात पण त्यांची किंमत करोडो रुपयांच्या घरात असते. म्हणून अमली पदार्थ विक्रेते श्रीमंत असतात. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी हे त्यांचे टार्गेट असून त्यांना प्रतिबंध करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर हे लोक हल्ला करतात. म्हणून समाजाकडून जर अमली पदार्थ विरोधी करत करणाऱ्या अधिकारी वर्गाला सहकार्य मिळाले तर व्यसनमुक्ती सहज शक्य आहे. कोणत्याही व्यसनाची सुरुवात तंबाखू, गुटखा, हुक्का हर्बल तंबाखू ह्या पासून होत असली तरी शेवटी तरुण मादक पदार्थांमध्ये वळतात. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ राजन वेळूकर यांनी मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले की आज कल्याणकारी समाजाच्या निर्मिती ची गरज आहे. परिस्थिती अत्यंत खराब आहे, समाजामध्ये खंडित संवेदनशीलता आलेली आहे. घटना घडतात, कालांतराने लोक विसरून जातात आणि मग पुन्हा काही अप्रिय घटना घडतात. त्यामुळे जे मिळवायचं आहे ते मिळत नाही म्हणून मुळात मानसिकताच बदलली पाहिजे. हुशार व्यक्तींची जेव्हा वाट चुकते तेव्हा त्यांना व्यसन लागते म्हणून अश्या लोकांना मदत आणि मार्गदर्शन मिळाले तर ते व्यसनापासून लांब जाऊ शकतात. या साठी सिंपथी, इम्पथी आणि कॉमपेशन या त्रिसूत्री चा वापर केला पाहिजे. तर अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार श्री हेमंत देसाई यांनी सांगितले की व्यसनमुक्तीच्या प्रयत्नांच्या कथा समाजासमोर आल्या पाहिजेत कारण हे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. सैराट सारखा सिनेमा अत्यंत यशस्वी होतो कारण लोक सिनेमाला गांभीर्याने घेतात पण जीवनाला गांभीर्याने घेत नाहीत. देशासाठी आपले काय योगदान आहे ह्याचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने केले पाहिजे. आणि व्यसनमुक्त होण्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून केली गेली पाहिजे. तसेच पैशावर आपल्या देशात उंची मोजली जाते, पण ज्ञानावर मोजली जात नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे कारण बुद्धिजीवी लोकांना आम्ही राज्यकर्ते बनवू शकलो नाही ही एक शोकांतिका आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हयाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता श्री अजयकुमार सर्वगौड यांचे हस्ते प्रा डॉ दयाघन एस राणे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे मुख्य संघटक अमोल मडामे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मिलिंद पाटील, श्री रुपेश आणि कु चेतना यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध लेखक ज्या मध्ये प्राध्यापक, डॉक्टर, समुपदेशक, पत्रकार विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे अनेक जिल्ह्यांचे संघटक उपस्थीत होते.

प्रा डॉ दयाघन एस राणे यांचा सत्कार करीत असताना श्री अजय सर्वगौड व्यासपीठावर उपस्थित अमोल मडामे,ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, आणि ड्रग आणि नारकोटिक्स विभागाचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे आणि इतर मान्यवर


