बोदवड (प्रतिनिधी )
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या तालुक्यातील उजनी दर्ग्यावर मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे आमदार व्हावे यासाठी मुस्लीम बांधवांनी मन्नत मानली होती. तदनंतर चंदू भाऊ पाटील हे आमदार झाल्याने बुधवार, ११ रोजी हा नवस पूर्ण करण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटील हे मुंबई येथील अधिवेशनाला असल्याने त्यांच्या पत्नी सौ यामिनी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उजनी येथील दर्ग्यावर चादर चढवून हा नवस पुर्ण करण्यात आला .
कोरोनाची भीती धाब्यावर ठेवून दर्शनासाठी गर्दी
देशभरात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असलेतरी भाविकांनी त्याची भीती न बाळगता दर्ग्यावर दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भाविक हजरत न्यामतुल्ला शाहवली बाबांकडे नवस करतात व मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात. दरम्यान, नवस पूर्ण करताना हजारो मुस्लिम बांधव व शिवसैनिक, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



