भुसावळ – ३ जून हा दिवस संपूर्ण जगात सायकल डे म्हणून ओळखला जातो. सुरुवातीस वाहतुकीसाठी सायकल प्रत्येक परिवाराची सदस्य होती. परंतु ८० च्या दशकानंतर स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाण वाढल्यानंतर सायकलचे महत्त्व कमी होत गेले. असे असले तरी आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सायकलिंगचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सायकलपटू आठवडय़ातून किमान दोन दिवस लांब पल्ल्याच्या सायकलिंगचा एकत्र सराव करतात. या सदस्यांपैकी काहींनी २०० किमी, ३०० किमी, ४०० किमी व ६०० किमी अंतराच्या सामान्यांसाठी अशक्यप्राय असणारे बीआरएम स्पर्धेत देखील सहभाग नोंदविला आहे. तर काहींनी या चारही स्पर्धा एकाच वर्षात पूर्ण केल्यामुळे त्यांना एसआर (सुपर रॉन्डानेर) हे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.
सायकलप्रती सामान्य नागरिकांमध्ये आवड निर्माण व्हावी या उद्देशाने भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सायकलपटूंतर्फे भुसावळ ते कुऱ्हा असे २० किमी अंतराची सायकलिंग आयोजित करण्यात आली होती. सोमवारी सकाळी ठीक ६ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून ते जामनेर रोडवरील कुऱ्हा गावापर्यंत व तेथून पुन्हा मैदानावर परत असा मार्ग ठरवण्यात आला होता. या उपक्रमात प्रविण फालक,गणसिंग पाटील, भाऊसाहेब पाटील, डॉ. महेश फिरके, दिलीप जोनवाल,राजेंद्र ठाकूर, प्रमोद शुक्ला, समीर चौधरी,जगदीश रेहपाडे,ज्ञानेश धांडे, हर्षमान दिलीप जोनवाल, विरेश विनोद बटाव, श्रेयस जगदीश अत्तरदे, राजपालसिंग राजपूत, प्रविण पाटील या पुरुष सदस्यांसोबतच मंजू शुक्ला व माया पवार या महिलांनी देखील यशस्वी सहभाग नोंदविला.



