बस प्रवासात नणंद-भावजयीचे साडेसहा लाखांचे दागिने चोरीला : जळगाव-भुसावळ दरम्यानची घटना –

जळगाव : दोन महिलांच्या पर्समधून सहा लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जळगावच्या अजिंठा चौफुलीवरून बसल्यानंतर लंपास करण्यात आले. ही घटना रविवार ,21 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी 24 एप्रिल रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पर्समधून अलगद लांबवले दागिणे
किरण योगेश बोरसे (34) या महिला आपल्या कुटुंबासह भुसावळ येथे वास्तव्याला आहे. रविवार, 21 एप्रिल रोजी दुपारी किरण बोरसे या नणंद मनिषाबाई सहावे यांच्यासोबत भुसावळ येथून बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.3553) मधून प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी महिलांच्या पर्समधून सहा लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

जळगाव शहरातील अजिंठा चौकातून प्रवास करत असतांना दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. हा प्रकार घडल्यानंतर बुधवार. 24 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.