भुसावळ -(प्रतिनिधि )-
चीन या देशातून हळूहळू संपूर्ण जगभर पसरत चाललेल्या करोना या विषाणू आजाराची लागण होण्याआधी त्याचा प्रतिबंध करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सध्या या आजाराची लागण झालेली नसली तरी खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी विद्यार्थ्यांना केले.
भुसावळ येथील संतोषीमाता सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर पंचायत समिती सभापती मनीषा पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांच्यासह केंद्रप्रमुख उपस्थित होते. प्रधान आपल्या मनोगतात म्हणाले की साध्या सर्दी खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स यासारख्या गंभीर आजारासाठी करोना विषाणू कारणीभूत ठरत असतात. सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे व खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यामुळे पसरतो. या आजारावर सध्या कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही मात्र रुग्णाला त्याच्या लक्षणांनुसार उपचार केले जात आहे. सध्या महाराष्ट्रात या आजाराची लागण झालेली नसली तरी खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य हित म्हणून श्वसनसंस्थेचे विकार असणार्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. हात वारंवार धुवावे. अर्धवट शिजलेले व कच्चे मांस खाऊ नये. फळे व भाजीपाला न धुता खाऊ नयेत. साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवावे. जंगली अथवा पाळीव प्राण्यांची निकटचा संपर्क टाळावा तसेच श्वसनास त्रास होणार्या व्यक्ती व विदेशातून आलेल्या व्यक्तींनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे देखील आवाहन गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी केले. सर्वसामान्य नागरीकांसाठी 104 क्रमांकाचा करोनाविषयक टोल फ्री नंबर देखील उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सोशल मीडियावर करण्यासंदर्भात अर्धवट माहिती असणारे चुकीचे व भीती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत असल्याने खात्री केल्याशिवाय हे संदेश पुढे पाठवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील प्रधान यांनी केले.



