भुसावळ (प्रतिनिधी )-
डाऊन पुणे-रायपूर एक्स्प्रेसमधून चोरी करून पसार झालेल्या राजकुमार कडू दवडे (23, रेल्वे स्टेशनजवळ, नेपानगर) व समीर शाह जब्बार शहा (18, दिनदयाळ नगर, भुसावळ) या आरोपींना भुसावळ शहर पोलिसांनी कोम्बिंग दरम्यान शुक्रवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास जेरबंद केले होते. या आरोपींनी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाणे हद्दीत चोरी केल्याने त्यांचा शनिवारी लोहमार्ग पोलिसांना ताबा घेत त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
रेल्वेत केली चोरी अन् अडकले शहर पोलिसांच्या जाळ्यात
डाऊन 04187 पुणे-झाशी स्पेशल ट्रेनच्या कोच क्रमांक एस- 2 बर्थ क्रमांक 72 वरून प्रवास करणार्या मेहजबीन हसन डोंगरी (36, विजयपूर, कर्नाटक) यांची लेडीज पर्स चोरट्याने लांबवली होती. त्यात 18 हजारांची रोकड, आठ हजारांचा मोबाईल तसेच एटीएम कार्ड तसेच अन्य प्रवासी तृप्ती चेतनानंद विश्वकर्मा (31, रा.भोपाळ) यांची लेडीज पर्स शुक्रवारी दुपारी दिड वाजता गाडी आल्यानंतर लांबवण्यात आली होती. पर्समध्ये चार हजारांची रोकड, मोबाईल व बांगड्या होत्या. या प्रकरणी दोघा प्रवाशांनी भोपाळ पोलिसात गुन्हा दाखल केला होता. यातील एका तक्रारदाराने चोरी गेलेल्या मोबाईलवर फोन लावल्यानंतर शहर पोलिसांनी तो उचचला तर तक्रारदाराने हा आपला मोबाईल असल्याचे सांगितल्यानंतर निरीक्षक ठोेंबे यांनी त्यांना दोघा संशयीत आरोपींना कोम्बिंगमध्ये पकडल्याची माहिती दिल्यानंतर भोपाळहून लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला. दरम्यान, अटकेतील आरोपी राजकुमार दवडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध यापूर्वीदेखील अनेक गुन्हे लोहमार्ग पोलिसात दाखल असल्याचे निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी सांगितले. दरम्यान, आरोपींच्या ताब्यातून लेडीज पर्स, फायटर, दोन हजार शंभर रुपये रोख, दोन सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या असल्यातरी न्यायालयाच्या आदेशानंतर हा मुद्देमाल लोहमार्ग पोलिसांना परत मिळणार आहे शिवाय दोन वेगवेगळ्या चोऱ्यांमधील सुमारे २२ हजारांची रोकड अद्याप हस्तगत करावयाची असल्याचे लोहमार्ग पोलिस सूत्रांनी सांगितले. तपास एएसआय भरत शिरसाठ करीत आहेत.



