भुसावळ, ता. २९ : येथील उत्कर्ष कलाविष्कार आयोजित व ओबेनॉल फाऊंडेशन प्रस्तुत १४ वा नानासाहेब देविदास फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सव उद्या (ता. १) पासून सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सात नाटके रसिकांना विनामूल्य पाहायला मिळणार आहेत.
या बाबत माहिती देताना उत्कर्ष कलाविष्कारचे अध्यक्ष अनिल कोष्टी म्हणाले की महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात होणाऱ्या या परिसराला नाटककार राहुल बनसोडे नाट्यपरिसर असे नाव देण्यात आले आहे. उद्या (ता. १) सकाळी साडे दहा वाजता ओबेनॉल केमिकल प्रा.लि. चे संचालक अश्विनीकुमार परदेशी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक अध्यक्षस्थानी राहतील. तर आमदार संजय सावकारे, उद्योजक राधेश्याम लाहोटी, महेश फालक, सुरेश पाटील, सुनिल जैन, विलास चौधरी, डॉ विनायक महाजन, पंडितराव सुरवाडे, महेंद्र मांडे, प्रमोद धनगर प्रमुख पाहुणे असतील. उद्घाटन झाल्यानंतर चाटे स्कुलच्या विद्यार्थ्यांचे ‘वारी’ हे बालनाट्य व उत्कर्ष कलाविष्कारची ‘सेल नसलेला रेडिओ’ ही एकांकिका सादर होईल. सायंकाळी पुण्याच्या आजकल संस्थेचे ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे नाटक व नाशिकच्या स पा न या संस्थेचे ‘तो राजहंस एक’ हे नाटक सादर होईल. तर शनिवारी (ता. २) संध्याकाळी ‘व्हाया सावरगाव खुर्द’ व टायनी टेल्स थिएटर निर्मित ‘कडेकोट कडेकोट’ हे नाटक सादर होईल. रविवारी (ता. ३) संध्याकाळी उत्कर्ष कलाविष्कार चे ‘अस्तित्वाची खिचडी’ हे नाटक सादर होईल. या व्यतिरिक्त छायाचित्र प्रदर्शन व नाट्य परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी या भरगच्च सांस्कृतिक मेजवानीचा भुसावळकर रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष अनिल कोष्टी व प्रसिद्धी प्रमुख सुशील पाटील यांनी केले आहे.

———-


