महावितरणचा प्रामाणिकांना शॅाक; पाच हजार ग्राहकांना एव्हरेज बिल

भुसावळ (प्रतिनिधी )- ,
श्रीनगर, गणेश कॉलनी, वेडी माता मंदिर परिसर, भुसावळ हायस्कूल, भिरुड कॉलनी, खळवाडी, काशीराम नगर, अष्ट विनायक कॉलनी, हुडको कॉलनी, अयोध्या नगर, भोई नगर, मोहित नगर, जुना सातारा या परिसरातील ५००० ग्राहकांना एव्हरेज रिडींग पाठवले आहे तर ५०० पेक्षा जास्त नागरिकांना दुसऱ्याच ग्राहकांच्या मीटरची देयके पाठवली जात आहे. देयक भरणा सूट असलेल्या तारखेच्या एक दिवस आधी वीज बिल नागरिकांना दिल्याने नियमित व वेळेवर बिल भरणाऱ्या ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे तरीही वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीज मीटर बसवणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालत आहे. शहरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांच्याकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी तक्रार केली आहे.
महावितरणच्या काराभरा विरोधात तक्रारीचा पाऊसच
श्रीनगर येथील भरत लोखंडे यांना तब्बल सलग आठ महिने एव्हरेज बिल दिले नियमितपणे देयक अदा केले त्यांनी दर महिन्याला अर्ज सादर केला आणि अचानक या महिन्यात त्यांना 12320 रुपयांचे देयक आले. साधारण परिवारातील ग्राहकाला अशी देयके पडवणारी नाही. रविंद्र ओंकार सोनवणे यांना आठ महिन्याचे बिल सुधारणा केलीच नाही. लीलाधर आनंद पाटील यांना दर महिन्याला 132 युनिटचे वाढीव बिल दिले जात आहे. भुसावळ हायस्कूल परिसरातील नीरज महेशदत्त तिवारी यांना अवाजवी बिल देऊन महिन्यातून दोन वेळेस महावितरणच्या कार्यालयाचा फेऱ्या कराव्या लागल्या. भोई नगर येथील सुरेश भोई यांना दुसऱ्याच ग्राहकाचे बिल दिले जात आहे. अयोध्या नगर येथील साहेबराव माळी यांना तर बिले दिली गेली नाही. खैरनार वाडीतील सर्वच ग्राहकांना वाढीव बिले आहेत. अश्या असंख्य तक्रारी शिवसेनेचे तालुका संघाटक प्रा.धिरज पाटील यांच्याकडे आलेल्या आहेत.
मीटरचा संगणकीकरणाचा फायदा नाहीच
गेल्या आठ महिन्यांपासून भुसावळमधील हजारो ग्राहकांना अवाच्या सवा रकमेची वीज बिले येत आहेत. यांमुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आर एफ मीटरचा संगणकीकरणाने काहीही फायदा झाला नाही. अजूनही मीटर रिडींग एजन्सीच रिडींग वाचन करीत असून चुकीचे रिडींग देत आहे.
महावितरणचा प्रामाणिकांना शॅाक: प्रा.धिरज पाटील
शहरात महावितरण कंपनीकडून नियमित वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकाकडून वीज बिल भरण्यास एखाद्या वेळेस उशीर झाल्यास लगेच त्रास दिला जात आहे; मात्र अनेक बड्या ग्राहक, काही बडे हॉटेल व्यावसायिक, संस्था, केंद्र यांची अनेक महिन्यांची हजारो रुपयांची थकबाकी असतानाही अशा लोकांना साधी विचारणाही करण्याचे धाडस हे अधिकारी किंवा कर्मचारी करत नाहीत. जुने वीज मीटर काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत; मात्र असंख्य ठिकाणी दबावापोटी अजूनही जुनेच वीज मीटर ठेवण्यात आले आहेत. नवीन आर एफ इलेक्ट्रॉनिक मीटर हे बोगस कंपन्यांचे असल्याचे समोर आले आहे. तपासणीसाठी पाठवण्यात येणारे फास्ट मीटरही नेहमीच योग्य असल्याचा अहवाल वीज मंडळाकडून दिला जात असतो.
वीज वितरण कंपनीचे अधिकारी, वीज मीटर बसवणाऱ्या ठेकेदारांना दंड ठोकावा व काळ्या यादीत टाकावे अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *