00

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १२ जानेवारी २०२४ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मैदानावर आयोजित कार्यक्रमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रात सुमारे रू. २००० कोटी किंमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन/समर्पण केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे; केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे; केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, रामदास आठवले; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवरांनीही यावेळी उपस्थिती लावली.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
खारकोपर-उरण टप्प्याचे उद्घाटन आणि उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या ईएमयू ट्रेनच्या उद्घाटनास हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
खारकोपर-उरण (टप्पा) चा नवीन १४.६० मार्ग किमी दुहेरी मार्ग विभाग हा बेलापूर-सीवूड-उरण विभागाच्या २७ मार्ग किमी दुहेरी मार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे ज्याची एकूण किंमत रू. ३००० कोटी आहे. रू. १४३३ कोटी खर्चाचा टप्पा-२ नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वेचा ३३% आणि सिडकोचा ६७% शेअरींग आहे. यामध्ये शेमतीखार, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण या ४ नवीन स्थानकांसह विभागात १ महत्त्वाचा पूल, २ मोठे पूल, ३९ छोटे पूल, ३ रोड ओव्हर ब्रिज आणि ३ रोड अंडर ब्रिजचा समावेश आहे.
सध्या नेरूळ/बेलापूर आणि खारकोपर दरम्यान चालणाऱ्या ४० उपनगरीय सेवा (२० जोड्या) आता दि. १३.०१.२०२४ पासून उरणपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत आणि त्या शेमतीखार, न्हावा शेवा आणि द्रोणागिरी स्थानकावर थांबतील.
उरण ते बेलापूर/नेरुळ स्थानकांदरम्यान गर्दीच्या वेळेत सेवांची वारंवारता प्रत्येक ३० मिनिटांनी, बेलापूर ते उरण आणि नेरुळ ते उरण स्थानकांदरम्यान गर्दीच्या वेळेत ६० मिनिटे असेल.
या विस्तारित मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत एकूण १० सेवा धावतील. ईएमयू ट्रेनच्या या विस्तारित सेवा विद्यार्थी, व्यापारी, दैनंदिन प्रवाश्यांना परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था पुरवून मदत होईल, त्यामुळे एसईझेड क्षेत्र आणि नवी मुंबईशी संपर्क वाढवतील.
नवीन थांबा स्थानक: शेमतीखार, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण
ट्रान्स-हार्बर लाईनवर ठाणे आणि ऐरोली दरम्यान दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन
ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावरील ‘दिघा गाव’ हे नवीन उपनगरीय स्थानक परिसरातील लोकांच्या फायद्यासाठी उघडण्यात येत आहे. हे स्टेशन ठाणे आणि ऐरोली दरम्यान आहे. ठाण्यापासून ३.२ किमी आणि ऐरोलीपासून २.६ किमी. MUTP-II योजनेंतर्गत MRVC द्वारे करण्यात येत असलेल्या ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाचा हा एक भाग आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि आधुनिक प्रवासी सुविधा असलेले हे स्थानक आहे. दिघा गाव स्टेशनची किंमत अंदाजे रू. ९० कोटी आहे.
दि. १३.०१.२०२४ पासून सर्व ट्रान्स-हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा नवीन दिघा गाव रेल्वे स्थानकावर थांबतील. दिघा गाव येथे नवीन स्थानक सुरू झाल्यामुळे परिसरातील हजारो लोकांना फायदा होईल जे सध्या लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी ठाणे किंवा ऐरोलीला जातात.
खार रोड आणि गोरेगाव (८.८ किमी) दरम्यानच्या नवीन सहाव्या लाईनचे राष्ट्राला समर्पण
रू. ४२५ कोटी खर्च करून बांधलेला हा प्रकल्प ८.८ किमीचा आहे आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाला. या विभागात २ मोठे पूल, १० छोटे पूल आणि १२ फूट ओव्हर ब्रिजचा समावेश आहे. वर्दळीच्या उपनगरीय विभागात असल्याने, दिवसा उपनगरीय वाहतुकीवर कोणताही परिणाम न करता रात्रीच्या वेळी मोठी कामे केली गेली.
या कार्यान्वित झाल्यामुळे उपनगरी मुंबईतील जलद मार्गांची क्षमता वाढली आहे, कारण वांद्रे टर्मिनसकडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या आता पाचव्या आणि सहाव्या मार्गावर धावत आहेत. विरार-बोरिवली-अंधेरी सेक्शनमधून शहराच्या दिशेने प्रवास करणा-या प्रवाशांना खार रोड-गोरेगाव सेक्शनवरील मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे विभाजन केल्यामुळे उपनगरीय गाड्यांच्या वक्तशीरपणाचा फायदा होतो.



