13 हजार 890 दुबार नावे वगळली; 30 जूनपासून बीएलओंच्या घरभेटी सुरू, 3 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर भुसावळ ( प्रतिनिधी ) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भुसावळ विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर-2026) मोहिमेला वेग आला असून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने व्यापक स्तरावर काम सुरू केले आहे. 30 जूनपासून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याची माहिती भुसावळचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, 1 जानेवारी 2026 रोजी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या 3 लाख 18 हजार 834 इतकी होती. त्यानंतर स्थलांतरित, मयत तसेच दुबार नोंदी असलेल्या 34 हजार 770 मतदारांची नावे वगळण्यात आली असून, 22 जून 2026 पर्यंत मतदारसंख्या 2 लाख 84 हजार 64 इतकी नोंदविण्यात आली आहे. 81.38 टक्के मॅपिंग पूर्ण मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 2 लाख 31 हजार 176 मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले असून, हे प्रमाण 81.38 टक्के इतके आहे. उर्वरित 52 हजार 888 मतदारांचे मॅपिंग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने गती वाढवली आहे. दुबार मतदारांवर विशेष लक्ष तपासणीदरम्यान 13 हजार 890 दुबार नावे आढळून आली असून ती मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच 5 हजार 255 मतदारांच्या छायाचित्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने संबंधितांकडून फॉर्म क्रमांक 8 भरून घेऊन रंगीत छायाचित्रांची अद्ययावत नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, एकूण 40 हजार 243 त्रुटी (अनॉमलीज) आढळून आल्या असून त्या टप्प्याटप्प्याने दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. 30 जूनपासून घरभेटी; 5 ऑगस्टला प्रारूप यादी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. प्रत्येक बीएलओकडून दररोज सरासरी 50 अर्ज भरण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. एखादा मतदार घरी उपलब्ध नसल्यास, घर बंद असल्यास किंवा स्थलांतरित झाल्यास त्याची स्वतंत्र नोंद ठेवून पंचनामा करण्यात येणार आहे. यानंतर 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. अंतिम मतदार यादी 3 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. प्रशासनाचे व्यापक नियोजन या मोहिमेसाठी 14 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 30 नोडल अधिकारी आणि 316 बीएलओ कार्यरत असून, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच गावपातळीवरील पोलीस पाटील यांचे सहकार्य घेतले जात आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करून एका केंद्रात 1200 पेक्षा अधिक मतदार राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. मतदार यादी शुद्ध व अद्ययावत ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच घरोघरी येणाऱ्या बीएलओंना अचूक माहिती देऊन मतदार नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले. पत्रकार परिषदेला निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी उपस्थित होते.



