भालोद महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित, कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. १२/०१/२०२४ रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती, राष्ट्रीय युवा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी हे होते. यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पी.ए. सावळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. दिनेश हि. पाटील यांचे ‘राष्ट्रीय युवा दिनः राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
डॉ. दिनेश पाटील यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांनी राष्ट्र उभारणीत कशी मोलाची भूमिका बजावली या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. जिजाऊ होत्या म्हणून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्यांची संकल्पना प्रत्यक्षात साकार केली. जिजाऊंनी शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, शौर्य, पराक्रम, संघटन कौशल्य, कुशल प्रशासक, युद्धनिती, कुटनिती आणि सत्त्वगुणांचे व सद्गुणांचे बाळकडू दिले. तर स्वामी विवेकानंदांनी जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली. अमेरिकेतील शिकागो येथे त्यांनी दिलेल्या भाषणाचा व त्यांच्या भुमिकेचा मतितार्थ विद्यार्थ्यांना समाजावून सांगितला. स्वामी विवेकानंदांनी पाश्च्यात जगला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून दिला. त्यांनी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माचा दर्जा प्राप्त करून दिला. ते म्हणाले की, जगात आंतरधर्मिय जागृकता वाढविण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. त्यांचे हिंदू सुधारणा चळवळीमध्ये व ब्रिटीश राजवटीत भारतात राष्ट्रवाद आणण्याचे मोठे योगदान आहे.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी यांनी आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या अभ्यास करावा. त्यांचे विचार, त्यांचे आदर्श आचरणात आणावेत असे आवाहन त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मिनाक्षी वाघुळदे यांनी तर आभारप्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिनेश महाजन यांनी केले. कार्यक्रमास प्रा. डॉ. के.जी. चौधरी, प्रा. डॉ. जतिनकुमार मेढे, प्रा. के.एस.पाटील, प्रा. मोहिनी तायडे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळकृष्ण चौधरी, किशोर चौधरी, पंकज नेहेते, मुबारक तडवी, रुपम बेंडाळे, चंद्रकांत लोखंडे, सागर सोनवणे, जयेश सोनवणे यांनी परिश्रम घेतले.