भुसावळ – ? वर्ष २०१४ ते वर्ष २०२१ या सात वर्षात, ज्या व्यक्ती इतर ठिकाणी नोकरीवर असताना, आपल्या महाविद्यालयांमध्ये उपस्थित आहे असे दर्शविण्याच्या उद्देशाने, बनावट व खोटी कागदपत्रे, ठराव तयार करून, त्यांच्या पगाराची सुमारे १०,५४,६३० रकमेची पगार बिले शासकीय कार्यालयात जमा करून, शासकीय निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी, श्रीमती जयश्री न्याती यांनी शहर पोलीस स्टेशन येथे अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या प्रकरणात दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ रोजी मा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणी नुसार, संस्था अध्यक्ष पद्माबाई मोतीलाल कोटेचा, संस्थेचे सचिव संजय सुरेशचंद्र सुराणा, प्रा. डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य जनार्दन विश्वनाथ धनवीज, बोगस शिक्षक रुकसाना बी ताजमल हुसेन या पांच ही जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज मा .अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी नाकारला. या प्रकरणात त्याच कालावधीत दोघांपैकी एका शिक्षिकेला कोटेचा सोसायटी मधून रुपये ४०,००,००० लाखाचे कर्ज देण्यात आलेले आहे. या पैशांचा फायदा आरोपींना झाला आहे का? अजून कोण कोणते व्यक्ती व कर्मचारी यांचा सहभाग असू शकतो, त्या दृष्टीने तपास करणे गरजेचे आहे. तसेच सदर गुन्ह्याची व्याप्ती अमर्यादित आहे इत्यादी कारणास्तव अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा भारतीय दंड संहिता 406, 409, 420, 465, 467, 470 आणि 471 सोबत 34 कलमा अंतर्गत नोंदविण्यात आलेला आहे. या आधी अंतरिम जामीन देखील नाकारण्यात आलेला आहे. लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच इतर व्यक्ती देखील आरोपी होऊ शकतात. या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.
श्रीमती जयश्री न्याती अर्जदार यांच्यातर्फे जामीन अर्जास लेखी हरकत घेण्यात आली होती. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील श्री मोहन देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली.



