भुसावळ : येथील उत्कर्ष कलाविष्कार संस्थेतर्फे नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सव (प्रायोगिक) येत्या शुक्रवार (ता. ३) सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दोन बालनाट्ये व चार मोठी नाटके अशी एकुण सहा नाटके सादर केली जाणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाट्यकर्मी अनिल कोष्टी यांनी महोत्सवाची माहिती देतांना सांगितले की महोत्सवाचे आयोजन रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात करण्यात आले आहे. महोत्सवात सहा नाटके सादर होणार असून महोत्सवाचे हे अकरावे वर्ष आहे. गेल्या दहा वर्षापासून खानदेश नाट्य महोत्सवात जवळपास ७५ नाटकांनी आपले सादरीकरण केले असून रसिकांनी मनोरंजनासह नाटकातील नवा प्रवाह, नवा प्रयोग, आणि नवीन रंगभाषा, आकृतीबंध आणि करमणुकीतून प्रबोधनात्मक बाबींचा आस्वाद घेतला आहे.मध्यंतरीच्या दोन वर्षाच्या कालखंडात कोविडमुळे नाट्य महोत्सव घेता आला नव्हता. यावर्षी नाट्य महोत्सव महोत्सवात मुंबई,रत्नागिरी, पुणे, जळगाव, भुसावळ येथील दर्जेदार नाटकांची मेजवानी मिळणार आहे.
नाट्यमहोत्सवाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे महोत्सवात पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता दोन बालनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहेत. ही बालनाट्य शालेय विद्यार्थ्यांना पाहायला मिळावी म्हणून संस्थेतर्फे सर्व शाळांना मोफत पास वाटण्यात आले आहे. नाट्यमहोत्सव सर्व रसिकांसाठी निःशुल्क असून कोणतेही तिकीट लावण्यात आलेले नाही तरी या नाट्य महोत्सवाचा अधिकाधिक रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन उत्कर्ष कलाविष्कार तर्फे करण्यात आले आहे.
यावर्षीच्या नाट्यमहोत्सवात सादर होणारे नाटके रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे असून संगीत गीत नृत्य अशा संमिश्र कलांनी नटलेला नाट्यविष्कार दोन नाटकातून पाहायला मिळणार आहे सोबतच स्थानिक कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी ही या नाट्यमहोत्सवात उपलब्ध होणार आहे नाट्यमहोत्सव हा एक सूर्जन महोत्सव असतो नाट्यमहोत्सवात नाटक सादर होतात समोरासमोर बसून याचा जिवंत अनुभव प्रेक्षक आणि नाटक करणारा रंगकर्मी दोन्ही घेऊ शकतात. समाजस्वास्थ्य निकोप राहण्यासाठी नाट्यमहोत्सवाची नितांत गरज असून कला ही माणसाला समृद्ध करत असते या निखळ हेतूने या नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ४) सादर होणारे पुणे निर्मित नाटक स्वर्गीय पांडुरंग रतिलाल महाजन यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले. अशी माहिती अनिल कोष्टी यांनी दिली.



