भुसावळ – मागील अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक १७ मधील सर्वेश्वर नगर, युवा संकल्प चौकाकडून पाटील मळा व रामदेव बाबानगरकडे जाणाऱ्या रस्ताचे नूतनीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांनी केली होती. त्यानुसार १ ते २ महिन्या आधी सर्वेश्वर नगर व सिद्धेश्वर मंदिराजवळील ढापे बनवण्यात आलेले होते ते काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सर्व ढापे हे आता नादुरुस्त झालेले आहेत. या ढाप्यावरून गटारीचे पाणी वाहत असल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. एवढेच नव्हे तर तुटलेल्या या ढाप्यात वाहने अडकून पडल्याच्या अनेक घटना ताज्या आहेत. वर्दळीच्या या भागात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या भागास आवर्जून भेट द्यावी असे निवेदन निलेश कोलते यांनी बुधवार 28 रोजी मुख्याधिकारी यांना दिले .

दुर्घटनेची जबाबदारी पालिकेने घ्यावी
सदर ढाप्या मुळे दुचाकीचालक, रिक्षा चालक, वयोवृद्ध महिला व विद्यार्थ्यांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. वाहने ढाप्यात आदळतात त्यामुळे अपघातास आमंत्रण मिळत आहे तर अनेक वाहनचालकांना पाठदुखीचा त्रास
होत आहे. खड्डे टाळण्याचा प्रयत्नात या ठिकाणी किरकोळ अपघातही घडत आहेत. रात्रीच्या वेळेला ढाप्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे वाट काढणे जिकरीचे होत आहे . तरी भुसावळ नगर पालिका प्रशासनाने त्वरीत सर्वेश्वर नगर, युवा संकल्प चौक, रामदेव बाबा मंदिराजवळील तसेच राजगौड सोसायटी जवळील तसेच सिद्धेश्वर मंदिर, मणियार हॉल जवळील या सर्व चारही ढाप्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अन्यथा या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी भुसावळ नगरपालिकेची असेल असेही नागरिकांचे म्हणणे आहे.


