रावेर : केंद्र सरकारने कृषी संबंधात पारीत केलेले तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकर्यांचा एकजुटीचा आहे मात्र हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी येथे केली. शुक्रवारी रावेर येथे सहकार पॅनलच्या मेळाव्याप्रसंगी या संदर्भात त्यांनी भाष्य केले.नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदे रद्द करावे लागल्याची प्रतिक्रिया सुद्धा एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

खडसे म्हणाले : शेतकर्यांच्या एकजुटीमुळे घ्यावा लागला निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधीत करत तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. शेतकर्यांनी प्रखर विरोध केल्यामुळे केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागल्याची प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी रावेर येथील मेळाव्यात सांगितले की, केंद्र सरकारने उशिरा का होईना पण शहाणपणाचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकर्यांवर अत्याचार करण्यात आले. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला, यात अनेक शेतकर्यांना मरण आले पण शेतकर्यांनी एकजूट दाखवल्यामुळे केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. खरं तर हा निर्णय खूप उशिरा घेण्यात आलेला आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका एकनाथराव खडसे यांनी केली.
यावेळी राष्ट्रावादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख योगीराज पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी, काँग्रेस उपशहराध्यक्ष संतोष पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील आदी उपस्थित होते.


