मुंबई –
रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिकूल परिस्थितीत मागील आर्थिक वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल रेल्वे कर्मचा-यांचे कौतुक केले आहे. रेल्वे कर्मचार्यांना लिहीलेल्या भावस्पर्शी पत्रात त्यांनी म्हटले आहे की,
“रेल्वे कुटुंबातील प्रिय सदस्यहो,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आपण आणखी एका आर्थिक वर्षाला निरोप देत असताना मी आज मोठ्या अभिमानाने, समाधानाने आणि कृतज्ञतेने लिहित आहे. गत वर्ष हे आपण आधी अनुभवलेल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा वेगळे होते. आपण आपले गमावलेले तर कधीच विसरता येणार नाही परंतु आपले धैर्य, दृढनिश्चय आणि संकल्प यामुळेच आपण या साथीच्या आजारातही विजयी झालो आहोत.
रेल्वे मंत्र्यांनी पुढे असेही लिहिले की, “सर्व देशभर पसरलेल्या कोविड -१९ या आजाराच्या काळातही आपल्या रेल्वे कुटुंबीयांनी स्वत: ला देशाच्या सेवेसाठी झोकून दिले आहे. सर्व जग जणू थांबलेले असताना, रेल्वेने कधी एक दिवसही सुट्टी घेतली नाही आणि अर्थव्यवस्थेच्या चाकांना गतिमान ठेवण्यासाठी मोठ्या जोखमीने अधिक कठोर परिश्रम घेतले. तुमच्या वचनबद्धतेमुळेच आपण आवश्यक वस्तूंचा अखंडित पुरवठा सुनिश्चित केला, मग ते वीज प्रकल्पांसाठी कोळसा असो, शेतकर्यांसाठी खत असो किंवा देशभरातील ग्राहकांसाठी धान्य असो. कोविड -१९ च्या विरोधातील लढाईत आपल्या निस्वार्थ योगदानास देश नेहमीच स्मरणात ठेवेल. आपल्या तीव्र इच्छाशक्ती आणि संकटातून लवकर बाहेर पडण्याच्या क्षमतेमुळे आपण या संकटाला संधीमध्ये बदलले आहे.”
रेल्वेने मागील वर्षभरात कर्मचार्यांनी केलेल्या कामाबदद्ल माननीय रेल्वे मंत्री लिहीतात की, “कुटुंबांना एकत्र करण्यासाठी आणि ६३ लाखाहून अधिक अडकलेल्या नागरिकांना घेऊन जाण्यासाठी ४,६२१ श्रमिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या. लॉकडाऊन दरम्यान मर्यादा असूनही, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांची ३७० मोठी कामे पूर्ण करण्यात आली. किसान रेल सेवा ही आपल्या ‘अन्नदात्यांस’ थेट मोठ्या बाजारांशी जोडण्याचे माध्यम बनली. आपण आपली अविरत सेवा देऊन हे शक्य केले आणि लाखो लोकांची मने जिंकली.
रेल्वे मंत्री मागील आर्थिक वर्षातील कामगिरीबद्दल असेही लिहितात की, “माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की रेल्वेने केलेले हे कार्य अतुलनीय असून यामुळे आर्थिक पुनर्प्राप्तीची दिशा मिळण्यास मदत झाली आहे. १,२३३ दशलक्ष टन एवढी मूळ मालवाहतूक लोडींग ही मागील कोणत्याही वर्षापेक्षा सर्वात जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात ६,०१५ आर.के.एम. एवढे रेल्वेचे विद्युतीकरण पार पडले आहे. जसे म्हटले जाते की, ‘विक्रम हे मोडण्यासाठीच बनतात’, भारतीय रेल्वेपेक्षा हे कुणीही जास्त चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. आज, रेल्वे ग्राहक-केंद्रित आहे आणि वेग वाढविण्यासाठी तसेच परिचालन क्षमता सुधारण्यासाठी असंख्य पावले उचलत आहे. याची प्रचिती ही यातून दिसते की मालगाड्यांचा सरासरी वेग जवळपास दुप्पट म्हणजेच ४४ किमी प्रतितास झाला असून प्रवासी गाड्यांचा वक्तशीरपणा ९६% पातळीवर कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात रेल्वे अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून परिणामी प्रवाशांच्या मृत्यूची संख्या शून्य आहे.”
कर्मचार्यांवर कौतुकाचा वर्षांव करताना रेल्वे मंत्री यांनी लिहिले आहे की, “तुमचा समर्पणभाव आणि तुमचे विलक्षण प्रयत्न यासाठी मी तुमचा आभारी आहे. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, आपल्या या प्रेरणेने आपण सर्व विक्रम मोडीत काढू, मोठे लक्ष्य साध्य करू, आपल्या कामगिरीसह इतरांसाठी आदर्श उदाहरणे तयार करू आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावू.”
असे मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.



