कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंना पुन्हा दिलासा ;


मुंबई –

भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी अजूनही दूर झालेल्या नाहीत. भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरील मुंबई उच्च न्यायायलातील सुनावणी आज पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी ८ मार्च रोजी होणार आहे.

पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने बजावलेल्या समन्सप्रमाणे खडसे ईडीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची अनेक तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांनी या कारवाईला आव्हान देणारी याचिका केली. खडसेंच्या याचिकेवर आज सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी आज पूर्ण होऊ न शकल्यानं पुढील सुनावणी ८ मार्चला होणार आहे.

आज काही कारणांमुळं एकनाथ खडसे यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ न शकल्यानं न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने सुनावणी ८ मार्चला ठेवली आहे. त्यामुळं पुढील सुनावणीपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई न करण्याची हमी ईडीने कायम ठेवली आहे.

दरम्यान, पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवरच खडसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून सातत्याने सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत खडसे यांनी गेल्या वर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *