खान्देशचा आवाज काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार ! महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची निवेदकपदी निवड ;

महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलना’च्या प्रमुख निवेदकपदी निवड ;
भुसावळ/श्रीनगर (प्रतिनिधी) : काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलन २०२६’ मध्ये महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २ ते ७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान होणाऱ्या या राष्ट्रीय संमेलनाच्या मुख्य सूत्रसंचालनाची (अँकरिंग) जबाबदारी उत्तर महाराष्ट्रातील नामवंत अँकर व कलावंत तुषार वाघुळदे (जळगाव) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

ही निवड महाराष्ट्र चित्रपट कलाकार असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची प्रमुख निवेदक म्हणून निवड झाल्याने संगीत व कला क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देशभरातील कराओके गायक-गायिका तसेच संगीतप्रेमींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलनाचे आयोजन काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यांमधून शेकडो कराओके गायक, गायिका, संगीतकार आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर या संमेलनात सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील या भव्य संमेलनाच्या सूत्रसंचालनासाठी महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची निवड होणे ही खान्देश आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. वाघुळदे हे मराठी फिल्म्स चेंबर्स ऑफ कॉमर्स, कोल्हापूरचे माजी सचिव, तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी सदस्य राहिले आहेत. सध्या ते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्यरत असून ‘ऑर्केस्ट्रा 7 स्ट्रिंग्स’ या प्रसिद्ध ग्रुपचे संचालक व ऑर्गनायझर म्हणूनही कार्यरत आहेत.

दमदार आवाज, बहारदार निवेदनशैली, उत्कृष्ट संवादकौशल्य, समयसूचकता आणि हजरजबाबीपणाच्या जोरावर तुषार वाघुळदे यांनी यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे प्रभावी सूत्रसंचालन केले आहे. नवी मुंबई, पनवेल, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, अहिल्यानगर, नाशिक, बऱ्हाणपूर, खंडवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, अकोला, धुळे, इंदूर, भोपाळ, इटारसी, चित्तोडगड, कोटा, सहारनपूर, विजयवाडा आदी ठिकाणी त्यांनी विविध कार्यक्रम गाजवले आहेत.

संगीत क्षेत्राची उत्तम जाण आणि आपल्या प्रभावी निवेदनातून प्रेक्षकांना कार्यक्रमाशी जोडून ठेवण्याची हातोटी लक्षात घेऊन आयोजकांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येते.

‘महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो’ – तुषार वाघुळदे

या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना तुषार वाघुळदे म्हणाले, “काश्मीरसारख्या विहंगम, निसर्गरम्य आणि नंदनवनासारख्या भूमीवर होणाऱ्या पहिल्या ऐतिहासिक राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलनाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समजतो. या राष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मला अत्यंत आनंद होत असून उर अभिमानाने भरून आला आहे. हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी मी माझे सर्वोत्तम योगदान देईन आणि महाराष्ट्र व खान्देशच्या लौकिकात मोलाची भर घालण्याचा प्रयत्न करेन.”

तुषार वाघुळदे यांच्या या निवडीबद्दल राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, संगीत क्षेत्रातील कलाकार, मित्रपरिवार, इव्हेंट ऑर्गनायझर्स आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले असून काश्मीरमधील राष्ट्रीय संमेलनाच्या यशस्वी सूत्रसंचालनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संपर्क : 9405057141