भुसावळ (प्रतिनिधी)-: भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील स्व. स्वप्निल स्मृती गोकुल ग्राममध्ये पहिल्यांदाच पोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सर्जा-राजांची विधिवत पूजा करून त्यांना नमन करण्यात आले. बैल हा शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक असून, त्याला शेतकऱ्यांचे दैवत मानले जाते. आधुनिक काळात शेतीच्या कामांमध्ये यांत्रिकीकरण वाढले असून बैलांची जागा मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने घेतली आहे. मात्र, शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे महत्त्व आजही कायम आहे. पोळ्याच्या निमित्ताने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा जपली जाते. ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी गोकुल ग्राममधील सर्व सर्जा-राजांची विधिवत पूजा करून नमन केले. यावेळी सरकारी अभियोक्ता ॲड. मोहन देशपांडे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजीव एम. तडवी, सहाय्यक सरकारी अभियोक्ता रवींद्र रोकडे व भूषण भामरे उपस्थित होते. मान्यवरांनीही पोळा सणाचा आनंद घेतला. यावेळी सर्व नंदींची यथायोग्य पूजा व आरती करण्यात आली. तसेच गोकुल ग्राममधील कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. बळीराजाचे औक्षण सौ. गायत्री जगताप व सौ. मंदा तोरे यांनी केले. याप्रसंगी सखाराम बारेला, गोलू राऊत, अप्पा जगताप, मनोज राठोड, रोशन बारेला, महेश जगताप व ईश्वर तोरे यांचा प्रा. डॉ. ललवाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोळा सणानिमित्त गोकुल ग्राममध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



