भुसावळ (प्रतिनिधी) : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पळासखेडा ता. बोदवड येथे पोक्सो कायदा, रॅगिंग प्रतिबंधक कायदा तसेच मुलांचे अधिकार याविषयी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, भुसावळ व बोदवड तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. जास्वंदी भंडारी व ॲड. जयश्री देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची माहिती देताना बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, सुरक्षित वर्तन, संशयास्पद प्रसंगात कोणाची मदत घ्यावी तसेच कायद्याने बालकांना दिलेले संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच रॅगिंगचे दुष्परिणाम आणि त्याविरोधातील कायदेशीर तरतुदी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी पत्रकार व समाजसेविका उज्वला बागुल यांनी विधी सेवा समितीच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. गरजू व दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.या कायदेविषयक शिबिरामुळे विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, रॅगिंग प्रतिबंध, बालहक्क तसेच विधी सेवा समितीच्या कार्याबाबत उपयुक्त माहिती मिळाली. रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांना राखीपौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. रक्षाबंधनाचा संदेश देत विद्यार्थ्यांना रक्षा-सूत बांधण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमास आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. रायभान तायडे, अधीक्षक श्री. पंकज फेगडे, श्री. पराग वारके, श्रीमती वृषाली लव्हाळे, श्रीमती सोनाली ढगे, श्री. नितीन सर, श्री. मातडे सर, श्री. दिलीप राठोड दादा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक रायभान तायडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांनी कायदेविषयक माहिती आत्मसात करून आपल्या हक्कांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थितांचे सहकार्य लाभले. श्री. पराग वारके यांनी आभार मानले.


