पोखरी तांडा येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव,भक्तिमय सुरांची मैफिल आणि गोपाळकाला दहीहंडी महोत्सवाचे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी ) :-  जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पोखरी येथील श्री स्वामी महाराज सेवा आश्रम मंडळातर्फे यंदाच्या श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाला दहीहंडी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.परिसरातील सर्व भाविकांनी या देखण्या सोहळ्याला सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.याप्रसंगी जळगाव येथील प्रसिद्ध "भक्तीनाद" भजन संध्या ग्रुपतर्फे भजन, गवळणी सादर केल्या जाणार आहेत; ही भक्तिमय सुरांची मैफिल दि.4 रोजी संध्याकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत होईल.या भजन संध्या कार्यक्रमात गायक व कलावंत निलेश पाटील ,'भक्तीनाद' ग्रुपचे प्रमुख व निवेदक तुषार वाघुळदे ,गायिका वृंदा पालखे,प्रवीण पाटील आदी सहभागी होणार आहेत.
श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १ वाजेपर्यंत होईल.रात्री १२ ते १ या वेळेत श्रीकृष्ण जन्म सोहळा पार पडेल. या दरम्यान 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा' या मंत्राचा १०८ आहुती महायज्ञ संपन्न होणार आहे. गोपाळकाला दहीहंडी महोत्सव शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२६, वेळ: संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत होणार आहे. पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला आणि दहीहंडी फोडण्याचा जल्लोष साजरा केला जाईल.
हा संपूर्ण सोहळा श्री गुरुपद परिसर आणि गुरुसुमंतजी सखाराम दरबार परिसर,पोखरी (जळगाव) येथे पार पडणार आहे.
भाविकांनी या मंगलमयी आणि उत्साही वातावरणात सहभागी होऊन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री स्वामी महाराज सेवा आश्रम मंडळ, पोखरी यांच्यावतीने करण्यात आली आहे.