जळगाव : अमली पदार्थांची तस्करी व विक्रीला आळा घालण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. नारायणवाला बाबा दर्ग्यासमोरील रोडवर सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून इफेड्रीन व गांजासह बर्गमन मोपेड असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जळगाव शहरातील नारायणवाला बाबा दर्ग्यासमोरील रोडवर इफेड्रीन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरूण, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बर्गमन मोपेडची झडती घेतली असता अमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी ९ लाख ८१ हजार ५०० रुपये किमतीची १ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीन पावडर, १ लाख ५ हजार ७०० रुपये किमतीचा २ किलो ११४ ग्रॅम गांजा आणि ३० हजार रुपये किमतीची बर्गमन मोपेड असा एकूण ४ किलो ७७ ग्रॅम मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत जप्त पदार्थ इफेड्रीन व गांजा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०७०४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ९(अ), २५(अ), ८(क) सह २०(ब)(ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली..


