भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील ‘भुसावळ जंक्शन’ या नवीन साप्ताहिकाच्या प्रकाशन समारंभात भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य, गोसेवक, सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. प्रा. डॉ. ललवाणी यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत राहून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत आपले कार्य सुरू ठेवले आहे. ‘निसर्गाकडे चला’ हा संकल्प घेऊन त्यांनी ॲग्रो टुरिझम व रेस्टॉरंटच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण जीवन, निसर्ग आणि पर्यावरणाशी निसर्गप्रेमींना जोडण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. याशिवाय अनेक महाविद्यालयांना पुस्तके भेट देणे, सामाजिक व शैक्षणिक संस्थांना विविध माध्यमांतून मदत करणे तसेच समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावणे, अशा विविध कार्यातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. निगर्वी स्वभाव, संघर्षमय जीवनप्रवास आणि अनेक संकटांवर मात करून समाजसेवेचा घेतलेला वसा यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. कार्यक्रमात प्रा. डॉ. नरेंद्र महाले यांनी प्रा. डॉ. ललवाणी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. शिक्षण, गोसेवा, सामाजिक कार्य, दानशूर वृत्ती आणि पर्यटन क्षेत्रातील त्यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्रातील एकमेव असे प्राध्यापक म्हणून त्यांनी ३२ विद्यार्थिनींच्या जीवनप्रवासाची माहिती ‘आपल्या घरट्यातून आकाशाकडे’ या पुस्तकातून मांडल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे, भुसावळचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, यावलच्या नगराध्यक्षा छाया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी सावकारे, यावलचे नगरसेवक अतुल पाटील, भुसावळचे शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, परीक्षेत बर्हाटे, पुरुषोत्तम नारखेडे तसेच बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. निवृत्त शिक्षक प्रमोद आठवले यांनीही मनोगतातून प्रा. डॉ. ललवाणी यांच्या कार्याचा आवर्जून गौरव केला. त्यांच्या कार्यातील सातत्य, सामाजिक जाणीव आणि समाजासाठी काहीतरी देण्याची वृत्ती यांचे त्यांनी कौतुक केले. सन्मानाला उत्तर देताना प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी डिजिटल माध्यमाने व्यापलेले व्यापक क्षेत्र, बदलते माध्यमविश्व आणि प्रिंट मीडियामध्ये साप्ताहिकाच्या माध्यमातून प्रवेश करण्याचे महत्त्व याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. “आजपर्यंत अनेक संस्था आणि संघटनांनी माझा गौरव केला आहे; मात्र ज्या भुसावळ शहराला मी माझी कर्मभूमी मानतो, त्याच कर्मभूमीत माध्यम क्षेत्राच्या वतीने झालेला हा सन्मान माझ्यासाठी विशेष आनंदाचा आणि समाधानाचा आहे,” अशा भावना प्रा. डॉ. ललवाणी यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी आयोजक व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांच्या या विशेष सन्मानाबद्दल हितचिंतक, मित्रपरिवार, आप्तस्वकीय व नातलगांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कर्मभूमीत झालेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी योगदानाला मिळालेली कौतुकाची पावती ठरली आहे.


