महायुतीत असूनही राष्ट्रवादीला डावलल्याची खंत

भुसावळातील आढावा बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सूर; पालकमंत्री व गिरीश महाजन यांची भेट घेणार
महायुतीत असूनही राष्ट्रवादीला डावलल्याची खंत


 भुसावळ (प्रतिनिधी)- प्रत्येक निवडणुकीच्या वेळी महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतले जाते; मात्र इतर वेळी पक्षाला सातत्याने डावलले जात असल्याची तीव्र नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्हा आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आली. शिवसेना आणि भाजपकडून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा सूरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत लावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्ह्याची मासिक आढावा बैठक शनिवारी, २९ रोजी येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

जिल्ह्यात अमळनेर मतदारसंघातून माजी मंत्री अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक आमदारांकडून शासकीय कार्यक्रम, बैठका तसेच महायुती सरकारच्या निधीतून मंजूर विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जात नसल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात नसल्याने स्थानिक पातळीवर अडचणी निर्माण होत असून, महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीला योग्य तो मानसन्मान मिळावा, अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

बैठकीत व्यक्त झालेल्या तीव्र भावना लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेने महायुती धर्म पाळून राष्ट्रवादी काँग्रेसशी समन्वयाची भूमिका ठेवावी, यासाठी रावेर लोकसभा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांची लवकरच भेट घेणार आहे. या भेटीत स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती मांडून त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

संघटन बांधणीसह निवडणुकांची तयारी

जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी अध्यक्षीय भाषणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या सूचना आणि अडचणींवर सविस्तर भाष्य केले. जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळावे, यासाठी बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रश्नांची प्रदेश पातळीवर दखल घेऊन सकारात्मक निर्णयासाठी आग्रही पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः एसआयआर प्रक्रियेत नव्याने जाहीर होणाऱ्या मतदार याद्यांची पडताळणी करून नावे वगळली गेली असल्यास किंवा अनोळखी नावांचा समावेश असल्यास तक्रारी दाखल करण्यासाठी पक्षाच्या बूथस्तरीय बीएलएंच्या माध्यमातून विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशेष कार्यकारी दंडाधिकारी या अशासकीय पदांवर पक्षाच्या इच्छुकांची नियुक्ती व्हावी, यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून त्यांची यादी तयार करण्याबाबतही चर्चा झाली. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने गट व गणनिहाय पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. रावेर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुकाध्यक्षांनी आपापल्या भागातील तयारीची माहिती बैठकीत दिली.

सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि ज्येष्ठ नेते भगतसिंग पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रावेरचे उपनगराध्यक्ष असिफ दारा शेख, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष डॉ. सोपान दुट्टे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष कुर्बान शेख, चोपडा तालुका सूतगिरणीचे संचालक शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवकचे अक्षय सोनवणे तसेच युवती जिल्हाध्यक्ष कु. भाग्यश्री ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

बैठकीस भुसावळ शहराध्यक्ष नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आशिक खान शेरखान, जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ, यावलचे माजी उपनगराध्यक्ष मुस्तफा शेख, भुसावळ तालुकाध्यक्ष विलास पाटील, रावेरचे योगेश पाटील, बोदवडचे निवृत्ती ढोले, मुक्ताईनगरचे गोपाळ पाटील, यावलचे कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, नगरसेवक कदीर खान व निलेश कोलते, मुक्ताईनगरचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ बागवान, फैजपूर शहराध्यक्ष रज्जाक शेख, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, अॅड. देवकांत पाटील, प्रा. अर्जुन पाटील, प्रशांत पाटील, किशोर दुसाने, डॉ. भरत धनगर, यावल महिला शहराध्यक्ष योगिता घोडके, रावेर तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इरफान शेख, भाऊसाहेब साळुंखे, शशिकांत देवरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, नईम बागवान, धर्मराज तायडे, शेख अलीम, प्रकाश पाटील, अतुल पाटील, विनोद पाटील, भुसावळ तालुका युवक अध्यक्ष अतुल चव्हाण, तालुका युवती अध्यक्ष सुमय्या सलीम पिंजारी, शेरखान जुबेर खान, जफर अली अजगर अली, वीरेंद्र मोरे, शेख वसीम शेख गफ्फार, वैभव महाजन, युनूस खान नसीर खान, समाधान पाटील, प्रेम यशवंत धांडे, मिलिंद कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.