मराठा समाजाला मागण्यांनुसार सवलती मिळाव्यात, हीच आमची भूमिका : केंद्रीय मंत्री रामदास आठवले ; महाड सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राज्यभर ‘समता क्रांती यात्रा’

भुसावळ प्रतिनिधी :
मराठा समाजाला त्यांच्या मागण्यांनुसार योग्य त्या सवलती मिळाव्यात, हीच आमची भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळताना मनोज जरांगे-पाटील यांनी हे प्रकरण व्यवस्थित आणि संयमाने हाताळावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा दौऱ्यावर आले असता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भुसावळ येथील राधाकृष्ण हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध सामाजिक व राजकीय विषयांवर भाष्य केले.

आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष एनडीएसोबत आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, अनेक ठिकाणी अपेक्षित प्रमाणात सवलती मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील विविध महामंडळांवर रिपाईच्या नेत्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याचेही आठवले यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत विचारले असता आठवले म्हणाले, “मराठा समाजाला त्यांच्या मागण्यांनुसार सवलती मिळाव्यात, हीच आमची भूमिका आहे. मात्र, हे प्रकरण योग्य पद्धतीने आणि संयमाने हाताळणे गरजेचे आहे.” कुणबी-मराठा संदर्भातील काही विषय सरकारने स्पष्ट करावेत तसेच आर्थिक निकषाच्या आधारे सवलती प्रदान कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
   महाड सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राज्यभर ‘समता क्रांती यात्रा’

महाड सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा संदेश देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे महाराष्ट्रात ‘समता क्रांती यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रेला १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सातारा येथून प्रारंभ होणार असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, ठाणे, मुंबई आणि कोकण या भागांतून यात्रा मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२६ रोजी महाड येथील स्मारकस्थळी यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भुसावळ येथे पत्रकार परिषदेत दिली.

बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पार्टी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन काम करीत असल्याचे आठवले यांनी सांगितले. सामाजिक ऐक्य आणि समतेचा विचार जनतेपर्यंत पोहोचविणे हा यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी रिपाई आठवले पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब भांबाळकर, ज्येष्ठ नेते रमेश मकासरे, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण जाधव, राजू सूर्यवंशी यांच्यासह नंदुरबार ,धुळे, जळगाव जिल्हयासह विविध ठिकाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.