फेकरीत पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; यावल, रावेर, भुसावळ तालुक्यातील स्पर्धकांचा सहभाग

फेकरी (ता. भुसावळ) : स्वातंत्र्यदिनानिमित्त फेकरी येथील जिल्हा परिषद शाळेत फ्रेंड्स क्लबच्या वतीने पॉवर लिफ्टिंग खुली बेंच प्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यावल, रावेर आणि भुसावळ या तालुक्यांमधून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सर्वच स्तरांतील खेळाडूंनी आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत स्पर्धेला रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकारण निकम यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थितींमध्ये फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष निशांत निकम, उल्हास बोरोले, प्रकाश सरदार, सिद्धार्थ निकम, महेंद्र चव्हाण, रमेश निकम, अन्वर शेख, योगेश सोनवणे, सिद्धार्थ मेढे, किरण हातोले आदी मान्यवर होते. उपस्थितांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके देऊन गौरविण्यात आले तसेच त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी फेकरी येथील फ्रेंड्स क्लबने गेल्या दोन महिन्यांपासून अथक परिश्रम घेतले. स्थानिक क्रीडाप्रेमींनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी महेंद्र चव्हाण सर यांनी सर्व सहभागी, पाहुणे व स्पर्धकांचे आभार मानले. सदर स्पर्धेमुळे या भागातील पॉवर लिफ्टिंग क्रीडाप्रकाराला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.