भाऊंच्या उद्यानात ‘रंग बिरंगी राखी लेके आयी बहना’ कार्यक्रमाने रंगली रक्षाबंधनाची संध्याकाळ

जळगाव (प्रतिनिधी ): रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी भाऊंच्या उद्यानात हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ‘रंग बिरंगी राखी लेके आयी बहना’ या कार्यक्रमाचे आयोजन के.के. टेक्सटाइल्स यांच्या सौजन्याने जळगाव नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, झुंबा ग्रुप भाऊंचे उद्यान व जैन कलेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. स्वरवेध फाउंडेशनने हा कार्यक्रम प्रस्तुत केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती माता व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण पंडित संजय पत्की, श्री किशन कुकरेजा, सौ. मनिषा पाटील, सौ. अनिता नाथानी, श्रीचंद आडवाणी व ललिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. श्री निळकंठ कासार यांनी गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली.
यानंतर कलाकारांनी रक्षाबंधन व बहीण-भावाच्या नात्यावर आधारित हिंदी-मराठी चित्रपट गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. ‘राखी धागों का त्योहार’, ‘ओ मेरी नैना जैसी बहना’, ‘देखा फूलों को काँटों को’, ‘राधिके तूने बासरी बजा’, ‘रंग बिरंगी राखी लेके आयी बहना’, ‘मेरे भैया मेरे चंदा’, ‘बहना ने भाई की कलाई से प्यार बाँधा है’, ‘हम बहनों के लिये मेरे भैया’, ‘चिंधी बाँधते द्रौपदी धागा’, ‘जुळला फुलांचा तार’, ‘फुलों का तारों का’, ‘मेरी प्यारी बहनी’, ‘या बहना ओ बहना’, ‘तेरी डोली मैं सजा दूँगा’, ‘कसमे वादे प्यार वफा’ तसेच ‘तुझे सूरज कहूँ या चंदा’ आदी गाणी सादर करण्यात आली.
ही गाणी श्री. भागवत पाटील, श्री. किशन कुकरेजा, श्री. निळकंठ कासार, श्री. अजित वाणी, सौ. विद्या भंगाळे, श्रीमती जयश्री वाणी आणि श्रीमती ज्योती राणे पाटील यांनी सादर केली. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार निवेदन श्रीमती ज्योती राणे पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला जळगाव नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व झुंबा ग्रुप भाऊंचे उद्यान यांच्या सर्व मान्यवर भगिनींसह मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. श्री. शरद पांडे यांच्यासह विविध कलावंतांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
या कार्यक्रमासाठी डॉ. भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांचे सौजन्य लाभले. तसेच जैन कलेक्शनचे संचालक श्री. प्रमोद जैन यांचे सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री. भागवत पाटील व श्री. निळकंठ कासार यांनी ‘ऐ मात तेरी सूरत से भगवान की सूरत क्या होगी’ हे भावपूर्ण गीत सादर केले. या गीताने उपस्थितांची मने जिंकत कार्यक्रमाची सांगता झाली.