स्वच्छ शाळा… समृद्ध शिवार! गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भुसावळ तालुक्यातील शेतकरी गटांचा निर्धार ;

भुसावळ (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भुसावळ तालुक्यातील फार्मर कप स्पर्धेत सहभागी शेतकरी गटांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काहुरखेडा, पिंपळगाव खुर्द, टहाकळी, सावतर निंभोरा आणि दर्यापूर येथील शेतकरी गटांनी गावातील शाळांची स्वच्छता करून शाळा परिसर स्वच्छ व सुंदर केला.

शेतीच्या व्यस्त कामांमधून वेळ काढत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श या शेतकरी गटांनी घालून दिला. शाळा परिसर स्वच्छ केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजण्यास मदत झाली असून, ‘स्वच्छ शाळा–निरोगी विद्यार्थी–समृद्ध गाव’ या संकल्पनेला चालना मिळाली.

फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयक नवनवीन प्रयोगांसोबतच सामूहिक सहभाग, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण होत आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित न राहता गावाच्या सर्वांगीण विकासात शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग अधोरेखित करणारी ठरली.

शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून गावाच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शेतकरी गटांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांनी कौतुक केले.