शुद्ध दूध व सकस आहाराची मागणी करणे हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली भुसावळ (प्रतिनिधी) – राज्यात मागील महिन्यात अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून भेसळयुक्त दूध, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कठोर कारवाई करण्यात आली. सर्वांचे लाडके साहेब श्री. तुकारामजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही कारवाई नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत समाधानकारक आणि आनंदाची बाब असल्याचे मत गोसेवक रोहित महाले यांनी व्यक्त केले आहे. भेसळयुक्त दुधामध्ये विविध प्रकारचे हानिकारक रासायनिक घटक मिसळले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुले अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे विविध आजारांना बळी पडू शकतात. शुद्ध दूध, मिठाई आणि सकस आहार मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून, अन्नातील भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने सातत्याने कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात विविध ठिकाणी असंख्य लिटर भेसळयुक्त दूध तसेच भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचा गांभीर्याने विचार केल्यास दिवसेंदिवस गोमाता व इतर पशुधनांची संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येते. पशुधनाची संख्या कमी झाल्याने दूध उत्पादनावर परिणाम होत असून, या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कृत्रिम व भेसळयुक्त दूध तयार करणारे कारखाने उभे राहत असल्याची चिंताजनक बाब आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी गोमाता व पशुधनाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. पशुधन संवर्धन हे आपल्या श्वासाइतकेच महत्त्वाचे असून, गोमाता व पशुधनाला कत्तलीपासून वाचविण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन गोसेवक रोहित महाले यांनी केले आहे. “गोमाता व पशुधनाचे रक्षण आणि संवर्धन हाच खऱ्या जीवनाचा आधार आहे. नागरिकांनी शुद्ध दूध व सकस आहाराची मागणी करावी, कारण निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली शुद्ध अन्नामध्येच आहे,” असेही रोहित महाले यांनी स्पष्ट केले.


