भुसावळ (प्रतिनिधी) - जळगावचे वाचनवेडे लेखक आनंदा लोटन पाटील हे समाजभान जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कमी बोलणे, कोणालाही कमी न लेखणे आणि विपुल वाचन व लेखन करणे ही त्यांच्या स्वभावाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आनंदा पाटील हे केवळ पुस्तकेच वाचत नाहीत, तर माणसांचे चेहरे आणि त्यांचे जगणे अत्यंत सूक्ष्मपणे वाचतात. त्यांच्या याच अभ्यासू व संवेदनशील दृष्टिकोनातून 'उजेड पेरणारी माणसं' या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. पुस्तके ही माणसाचे आयुष्य घडवतात आणि विचारवंत माणसे समाज व देश घडवतात, हा विचार त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे. समाजाचे वास्तव मांडणारी, आशेचा किरण दाखवणारी आणि संघर्षातून वर्तमान घडवणारी माणसे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक समृद्ध वाट निर्माण करतात. मानवी समाजात वेगवेगळ्या स्वभावाची माणसे आढळतात. काहींचा कल स्वार्थाकडे, अधोगतीकडे किंवा विनाशाकडे असतो; तर काही माणसे स्वार्थापलीकडे जाऊन त्याग, संघर्ष आणि बलिदानातून समाजहित जपतात. छोट्या-छोट्या कृतींतून समाजसेवेचा ध्यास घेणाऱ्या अशाच ध्येयवादी व्यक्तींचा शोध आनंदा पाटील यांनी या पुस्तकात घेतला आहे. पुणे येथील 'पेन पब्लिशिंग हाऊस' (प्रभा देवा झिंजाड) यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे शीर्षकच वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण करते. या पुस्तकात लेखक आनंदा पाटील यांनी एकूण ८४ निष्ठावंत व समाजहितैषी व्यक्तींची व्यक्तिचित्रणे रेखाटली आहेत. ही सर्व माणसे आपापल्या परिसरात अत्यंत निःस्वार्थीपणे कार्यरत असून, अंधारलेल्या वाटांवर प्रकाशाची किरणे पसरवण्याचे काम करत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारवारसा जोपासणारे उच्चशिक्षित भीमशाहीर प्रतापसिंगदादा बोदडे यांच्यापासून ते कलाक्षेत्रात नवी ओळख निर्माण करणारे उत्कर्ष नेमाडे यांच्यापर्यंत, विविध क्षेत्रांतील ध्येयवेड्या व्यक्तींचा परिचय यात करून दिला आहे. हे पुस्तक वाचकाला सकारात्मकतेची जोड देऊन, संकटांवर मात करत यशाकडे कसे जावे, याचे उत्तम मार्गदर्शन करते. लेखकाची तटस्थता हे या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. कोणत्याही पूर्वग्रहाविना, द्वेष वा मोहाशिवाय समाजाकडे आणि व्यक्तींकडे पाहण्याची दृष्टी फार कमी साहित्यिकांकडे असते. आनंदा पाटील यांनी ही तटस्थता आणि पारदर्शकता आपल्या लिखाणात जपली आहे. पुस्तकाला लाभलेली प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांची अर्थपूर्ण प्रस्तावना आणि संतोष घोंगडे यांचे आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकाचे मूल्य वाढवते. लेखकाने 'अंतरीची ओल' या मनोगतात सांगितलेला त्यांच्या वडिलांचा किस्सा अत्यंत स्पर्शून जाणारा आहे. "घरात हजारो पुस्तके आहेत, पण तू लिहिलेलं एकही पुस्तक नाही. गावाच्या इतिहासात पुस्तकावर नाव असलेला पहिला लेखक तू व्हावास," या वडिलांच्या साध्या पण भावूक शब्दांनी लेखकाच्या जीवनप्रवासाला नवी दिशा दिली. ग्रामीण भागातील शेतकरी, वंचित, उपेक्षित आणि श्रमिकांच्या जीवनाला जवळून अनुभवणाऱ्या आनंदा लोटन पाटील यांचे हे वास्तववादी लेखन वाचकांच्या मनाला थेट भिडते. हे पुस्तक नव्या पिढीच्या जाणिवा प्रगल्भ करणारा आणि सामाजिक स्वास्थ्याचा आरसा ठरवणारा एक उत्कृष्ट विचारसंग्रह आहे. - डॉ. मिलिंद विनायक बागूल, जळगाव


