भुसावळ ( प्रतिनिधी )- एसटी महामंडळाच्या भुसावळ आगारात तसेच बस स्थानकावर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. भुसावळ आगारात आगार व्यवस्थापक श्री. प्रमोद चौधरी, तर बस स्थानकावर वाहतूक निरीक्षक श्री. जयेश लोहार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवल्याबद्दल त्यांना स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच वर्षभरात २६० दिवस सेवा बजावताना विना अपघात कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्तव्यनिष्ठ चालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. या चालकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र गीत, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण आगार परिसर दुमदुमून गेला. देशभक्तिपर गीतांमुळे परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त आगार परिसरात आकर्षक रांगोळ्या काढून परिसर सुशोभित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आगारातील बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


