जळगाव–भादली ५व्या मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत भादली यार्ड रीमॉडेलिंगचे काम यशस्वीरीत्या पूर्ण

भुसावळ (प्रतिनिधी)- 

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जळगाव–भादली ५व्या मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत भादली यार्ड रीमॉडेलिंगचे महत्त्वपूर्ण काम दिनांक १२.०८.२०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कामामुळे भुसावळ विभागातील रेल्वे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, मार्ग क्षमता वाढ आणि रेल्वे संचालनातील कार्यक्षमता व लवचिकता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

व्यस्त भुसावळ–जळगाव मार्गावरील वाहतूक क्षमता वाढविणे आणि रेल्वे परिचालन अधिक सुरळीत व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने भादली यार्डचे रीमॉडेलिंग करण्यात आले. नॉन-इंटरलॉकिंग (NI) कालावधीत खालील प्रमुख कामे पूर्ण करण्यात आली:

1. १ इन १६ प्रकारचे ७ टर्नआउट बसविण्यात आले.
2. १ इन १२ प्रकारचा १ टर्नआउट बसविण्यात आला.
3. जळगाव–भुसावळ डाउन तिसऱ्या मार्गिकेचे ५१० मीटर स्लीविंग करण्यात आले.
4. डाउन मेन लाईनचे ६७४ मीटर रीग्रेडिंग करण्यात आले.
5. अप मेन लाईनचे ६७४ मीटर रीग्रेडिंग करण्यात आले.
6. विद्यमान इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग मध्ये आवश्यक बदल करून मार्गांची संख्या ३५ ने वाढविण्यात आली.

नॉन-इंटरलॉकिंगचे काम ११.०८.२०२६ रोजी रात्री २०:३५ वाजता सुरू झाले आणि १२.०८.२०२६ रोजी सायंकाळी १८:५५ वाजता यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. या कालावधीत एकूण १३९ गाड्यांचे परिचालन करण्यात आले. यामध्ये १०८ प्रवासी गाड्या आणि ३१ मालगाड्यांचा समावेश होता.

गाड्यांच्या परिचालनाचा तपशील पुढीलप्रमाणे:

- अप दिशेने: ७० गाड्या – ५६ प्रवासी गाड्या व १४ मालगाड्या
- डाउन दिशेने: ६९ गाड्या – ५२ प्रवासी गाड्या व १७ मालगाड्या

काम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी कॉरिडॉर ब्लॉकचे नियोजन टप्प्याटप्प्याने करण्यात आले:

1. डाउन मेन लाईन व तिसरी मार्गिका: ०८:४५ ते १०:४५ वाजेपर्यंत
2. अप मेन लाईन: १०:५० ते १२:५० वाजेपर्यंत
3. चौथी मार्गिका: ११:४५ ते १३:४० वाजेपर्यंत
4. अंतिम संयुक्त अप व डाउन ब्लॉक: १६:०० ते १९:०० वाजेपर्यंत

सततच्या पावसामुळे प्रतिकूल हवामानाची परिस्थिती असतानाही संपूर्ण काम नियोजित कालावधीत आणि निर्धारित वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

जळगाव–भादली ५वी मार्गिका प्रकल्प हा मध्य रेल्वेचा सुमारे ८.६६ ते ९ किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प असून, भुसावळ–जळगाव या अत्यंत व्यस्त रेल्वे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. भादली यार्ड रीमॉडेलिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर आता या प्रकल्पांतर्गत जळगाव यार्ड रीमॉडेलिंगच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

भादली यार्ड रीमॉडेलिंगच्या या महत्त्वपूर्ण कामामुळे जळगाव–भादली विभागातील गाड्यांच्या परिचालनाची क्षमता आणि कार्यक्षमता अधिक बळकट होण्यास मदत होणार असून, रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे.

मध्य रेल्वे, भुसावळ विभागाने प्रतिकूल हवामान आणि सततच्या पावसाची आव्हानात्मक परिस्थिती असतानाही हे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे सर्व अधिकारी, अभियंते, पर्यवेक्षक, कर्मचारी आणि कामगार यांच्या समर्पण व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

भादली यार्ड रीमॉडेलिंगचे यशस्वी पूर्णत्व हे रेल्वे मार्ग क्षमता वाढ, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, परिचालन कार्यक्षमता आणि प्रवासी व मालवाहतूक ग्राहकांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह व सुरळीत रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याच्या मध्य रेल्वेच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे सूचक आहे.