हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सेंट्रल रेल्वे सीनियर सेकंडरी स्कूल, भुसावळ येथे प्रभात फेरीचे आयोजन

 भुसावळ (प्रतिनिधी) - देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे, भुसावळ विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सेंट्रल रेल्वे सीनियर सेकंडरी स्कूल, भुसावळ येथे दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रार्थना सभेत विशेष चर्चासत्राने झाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री सत्यनारायण छावल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रध्वजाचे महत्त्व, देशप्रेम तसेच देशाप्रती नागरिकांच्या कर्तव्यांची माहिती दिली.

विशेष चर्चासत्रानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. प्रभात फेरीची सुरुवात सेंट्रल रेल्वे सीनियर सेकंडरी स्कूल, भुसावळ येथून झाली. ही प्रभात फेरी रेल्वे रुग्णालय, भुसावळ, परिसरातील रेल्वे वसाहती तसेच अनिल नगर येथून मार्गक्रमण करत पुन्हा विद्यालयाच्या परिसरात पोहोचली.

प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन उत्साहाने देशभक्तीपर घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या प्रभात फेरीने मार्गातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत राष्ट्रीय अभिमान, एकता आणि देशभक्तीचा संदेश दिला.

मध्य रेल्वे, भुसावळ विभागातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिक तसेच रेल्वे परिवारामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.