भुसावळच्या पी.के. कोटेचा महिला महाविद्यालयात POCSO, रॅगिंग व बालविवाहविरोधी कायद्यांवर मार्गदर्शन

भुसावळ प्रतिनिधी :
बालकांचे हक्क, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO Act), रॅगिंग तसेच ‘बाल विवाह मुक्त भारत’ या विषयांवर कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पी.के. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ येथे कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

तालुका विधी सेवा समिती, भुसावळ येथील PLV सौ. स्वाती भोळे यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. PLV रूपाली नेवे यांनी विद्यार्थिनींना कायदेविषयक पत्रके वाटप करण्यास सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस बालकांचे हक्क, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अशा घटनांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर तरतुदी तसेच रॅगिंगविरोधी कायद्याबाबत अॅड. प्रिया अडकमोल यांनी विद्यार्थिनींना सविस्तर कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालविवाह रोखण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबतही जनजागृती करण्यात आली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीना चौधरी यांनी विद्यार्थिनींना मोबाईलच्या वापराबाबत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी माधुरी भुतडा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विद्यार्थिनींनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध कायदे व त्यांच्या हक्कांबाबत माहिती जाणून घेतली.