मुक्ताईनगर : पगाराचे थकीत पैसे मागितल्याच्या रागातून हॉटेल मालकाने वॉचमनला गॅरेजमध्ये नेऊन लाकडी काठीने डोक्यात गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यात घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकूळ तारासिंग जाधव (वय ५०, रा. निंभोरा, ता. रावेर, जि. जळगाव) असे मृत वॉचमनचे नाव आहे. जाधव हे गेल्या पाच महिन्यांपासून मुक्ताईनगर–बऱ्हाणपूर महामार्गावरील उचंदा शिवारातील ‘शेर-ए-पंजाब’ ढाब्यावर वॉचमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी सुमित्राबाई जाधव (वय ५५) या देखील याच हॉटेलमध्ये पोळ्या बनवण्याचे काम करतात. ढाबा मालक कमलजीतसिंग प्रितमसिंग याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पती-पत्नी दोघांचाही पगार दिला नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास गोकूळ जाधव यांनी कमलजीतसिंग यांच्याकडे आपल्या हक्काच्या पगाराचे पैसे मागितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. पगाराचे पैसे मागितल्याच्या रागातून संतापलेल्या कमलजीतसिंग याने गोकूळ जाधव यांना रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गॅरेजजवळ नेले. तेथे त्यांच्या डोक्यात लाकडी काठीने जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत जाधव यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले. पतीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच सुमित्राबाई जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. जाधव यांना तातडीने प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी भुसावळ येथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांना बऱ्हाणपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी मृत गोकूळ जाधव यांच्या पत्नी सुमित्राबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपी कमलजीतसिंग प्रितमसिंग याच्याविरोधात विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


